संस्कृतायन – भारवीची थोरवी

>> डॉ. समिरा गुजर जोशी

भारवीकृत किरातार्जुनीय या काव्यात संतप्त द्रौपदीने प्रश्न विचारताच तिच्या मताला दुजोरा देणारे वचन भीम देतो. हा युक्तिवाद मांडत असताना भीमाने दिलेला सुंदर दृष्टांत भारवीच्या लेखणीचे सामर्थ्य प्रकट करणारा आहे.

मागील लेखात आपण पाहिले की आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला न घेता आपण स्वस्थ बसून का आहोत? तुम्ही पेटून कसे उठत नाही असा प्रश्न संतप्त आणि अपमानित द्रौपदीने उपस्थित केला होता. याला दुजोरा देणारे वचन तिच्या पाच पतींपैकी पहिल्यांदा येतात ते भीमाकडून. अमर्याद शारीरिक शक्ती आणि निर्मळ स्वच्छ मन असलेल्या भीमाने असे उसळी मारल्यागत वर येऊन तिची बाजू घेणे त्याच्या स्वभावाला साजेसे वाटते. द्रौपदी एरवी अशा प्रकारे व्यक्त झालेली नाही पण तिचा राग स्वभाविक आहे आणि तिचे बोलणे रागातून आलेले असले तरी तिचा युक्तिवाद बिनतोड आहे, असे तो सुरुवातीलाच म्हणतो. तो आता आपला मोहरा वडील बंधू युधिष्ठिराकडे वळवून म्हणतो की आपण युद्धशास्त्राचा आणि अनेक विद्यांचा अभ्यास केलेला असूनही आत्ता आपल्या बुद्धीची स्थिती दलदलीत अडकलेल्या हत्तीणीप्रमाणे झाली आहे. तुमची जर कल्पना असेल की आपण वनवासाचा अवधी पूर्ण करू आणि दुर्योधन आपल्याला राज्य परत करेल तर हा केवळ भ्रम आहे. तुम्ही हा निरुत्साह का अंगिकारला आहे? तुमच्या आम्हा बंधूंच्या शक्तीवर विश्वास नाही का? यानंतर तो तेजस्वी स्वभावाचे वर्णन करताना एक सुंदर दृष्टांत देतो. भारवीच्या लेखणीचे सामर्थ्य अशा ठिकाणी उत्कटपणे व्यक्त होते.
किमपेक्ष्य फलं पयोधरान् ध्वनत प्रार्थयते मृगाधिप।
प्रकृति खलु सा महीयस सहते नान्यसमुन्नतिं यया?
मेघाची गर्जना ऐकली की सिंह त्याला प्रतिसाद देणारी गर्जना करतो ती कोणत्या फळाच्या अपेक्षेने. कुणी आव्हान दिले तर ते स्वीकारायचे हा तेजस्वी लोकांचा नैसर्गिक स्वभाव असतो. ही त्यांची उर्मी असते की ते दुस्रयाचा उत्कर्ष मुकाटय़ाने पाहत बसत नाहीत.

येथे दुसऱयाचा उत्कर्ष सहन होत नाही असा भाव नीट समजून घ्यायला हवा. हे एक competetive spirit आहे म्हणूया. त्याच्या विषयीच्या मत्सराचा भाग नसून ती जिंकण्याची नैसर्गिक इच्छा आहे. आणि यशस्वी होण्यासाठी मनात ही जिद्द हवीच. तोच तर पुरुषार्थ आहे. थोडक्यात ही वेळ प्रतिकार करण्याची आहे, स्वस्थ बसण्याची नव्हे असे भीमाने आपले मत ठामपणे मांडले. त्यावर आता युधिष्ठिर उत्तर देणार आहे. इथे खरी भारवीची कसोटी आहे. कारण शांत वृत्तीचे समर्थन करणे ही अवघड गोष्ट आहे. पांडवांसारख्या मुळात शक्तिशाली असणाऱया पक्षाने तर गप्प का बसावे, ह्याचे समर्पक उत्तर देणे अवघड आहे. पण भारवी ह्याही कसोटीला उतरलेला दिसतो. युधिष्ठिराने आपल्या उत्तराची सुरुवात भीमाचे कौतुक करून केली आहे. त्यासाठी त्याने काय म्हटले आहे ते आधी पाहू.

स्फुटता न पदैरपाकृता न च न स्वीकृतं अर्थगौरवं ।
रचिता पृथगर्थता गिरां न च सामर्थ्यं अपोहितं क्वचिथ् ।। 2.27 ।।
उपपत्तिरुदाहृता बलादनुमानेन न चागम क्षत ।
इदं ईदृगनीदृगाशय प्रसभं वत्तुं उपक्रमेत क ।। 2.28 ।।

अवघड शब्दांच्या वापरामुळे स्पष्टता कधीही दूर केली जात नाही; अर्थाचे गांभीर्य कधीही सोडले जात नाही; वाक्यातील शब्दांना स्वतंत्र, नेमकी अर्थस्थिती दिलेली असते; आणि कुठेही त्यांचे सामर्थ्य कमी झाल्याचे आढळत नाही. विधाने केवळ हट्टाने किंवा बळजबरीने सिद्ध केली जात नाहीत, ती तर्कसंगत अनुमानाच्या आधारावर मांडली जातात; ती परंपरागत प्रमाणांच्या विरुद्ध ही होत नाहीत म्हणजेच शास्त्र संमतच असतात ; एखादी सुसंस्कृत व संतुलित अंतप्रवृत्ती असलेली व्यक्ती असे निर्भयपणे बोलण्याचे धाडस करते.

न च न स्वीकृतं अर्थगौरवं । – इथे दोन न चा वापर करून होकार साधला आहे. नाही असे नाही म्हणजेच आहे अशा प्रकारची ही रचना आहे. इथे आलेला अर्थगौरव हा शब्द ही महत्वाचा आहे.

खरेतर हा श्लोक जरी भीमाच्या बोलण्याची वैशिष्टय़े सांगणारा असला तरी हे सगळे गुण भारवीच्या लिखाणात ही आढळतात, असे समीक्षकांना ही वाटते, त्यामुळे भारवीने जणू स्वतच स्वतचे सार्थ कौतुक केले आहे. किंवा त्याने त्याच्या मनातील उत्तम लेखनाचे निकष सांगितले आहेत ते त्याला स्वतलाही लागू पडतात असं म्हणूया. म्हणून भारविचा अर्थगौरव असे म्हटले जाते. अशा प्रकारे भीमाच्या वक्तव्याचे कौतुक केल्यानंतर युधिष्ठिराने मांडलेला स्वपक्षही अतिशय प्रभावी आहे. अनेकदा भारत देशाची आंतरराष्ट्रीय धोरणे आपण ऐकतो आहोत की काय असे वाटावे इतके त्याचे म्हणणे सहसंबंध दर्शवणारे आहे. त्याविषयी पुढील लेखात बोलू.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)
[email protected]