
>> डॉ. समिरा गुजर जोशी
सध्या आपला देश युद्धजन्य परिस्थितीतून जात आहे. प्रतिपक्षाकडून खोटय़ा माहितीचा प्रसार वारंवार केला जात आहे. त्यांच्या सोशल मीडियावरून धडधडीतपणे खोटय़ा गोष्टी सांगितल्या जात आहेत, पण रामायणातील युद्धकांड वाचताना लक्षात येते की, युद्धात अशा प्रकारे खोटे बोलणे, वल्गना करणे, यशस्वी झालो आहोत असा आभास उत्पन्न करणे ही आसुरी वृत्ती आहे. राम-रावण युद्धात रावणाच्या बाजूने अनेकदा असे खोटे बोलण्यात आले आहे. त्यापैकीच एक असणारा हा नागबाणांचा प्रसंग आज पाहू.
युद्धाचा पहिलाच दिवस. वानर सैन्य सर्वत्र विजयी होत असताना दिवस मावळला. अंधार पडू लागला, पण युद्ध काही थांबेना. राम आणि लक्ष्मण बाणांचा वर्षाव करत होते. एका वेळी शेकडो राक्षस त्यांच्या बाणांनी कोसळत होते. आज दिवसभराच्या युद्धामध्ये अंगदने इंद्रजिताच्या – रावणाच्या मुलाच्या सारथ्याला मारले होते. त्याचा रथ मोडला होता. त्यानंतर इंद्रजित नाहीसा झाला होता.
समोर आलेल्या शत्रूशी युद्ध करायचे हेच वानर सेनेचे धोरण होते, पण राक्षस हे मायावी कूटयुद्ध खेळण्यात निष्णात होते. त्याचप्रमाणे इंद्रजितने अंधाराचा फायदा घेऊन लपून बाण मारायला सुरुवात केली. तो अत्यंत चपळाईने जागा बदलत नागबाणांचा वर्षाव करू लागला. ते बाण आकाराने विचित्र असत. ते पुढील टोकाकडून वेडय़ावाकडय़ा वळणाचे असतात. ते शरीरात एकदा घुसले की, काढता येत नसत. या बाणांनी राम-लक्ष्मण, दोघेही घायाळ झाले आणि ग्लानी येऊन खाली कोसळले.
युद्धात सैन्यदलाने आपले आत्मबळ सांभाळणे किती गरजेचं असते यासाठी रामायणातील हा कथाभाग फार महत्त्वाचा आहे. राम-लक्ष्मण कोसळले ही बातमी लगेच सगळीकडे पसरली. इंद्रजितने लंकेत जाऊन आपल्या परामाचा डांगोरा पिटला. लंकेत विजयोत्सव सुरू झाला. वानरांच्या सैन्यात मात्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले. त्या वेळी बिभीषण पुढे आले. त्यांनी सुग्रीवाला सांगितले की, राम-लक्ष्मण जखमी झाले असले तरी ठार झालेले नाहीत. सैन्याचे मनोबल टिकवायला हवे.
अशा वेळी गैरसमज वा अफवा किती सहज पसरतात हे महर्षी वाल्मीकींनी येथे फार उत्तम प्रकारे दाखवले आहे. बिभीषण जवळ आल्यावर व तो आपल्याच पक्षातील आहे हे ठाऊक असताना अंधारामुळे आणि मनोबल खचल्यामुळे मेघनाद आला आहे असे समजून वानर सैन्यात गोंधळ माजू लागल्याचे वर्णन इथे येते.
चुकीच्या बातम्यांविषयी खात्री पटवण्याचे प्रकार कसे होतात, याचेही उदाहरण इथे सापडते. लंकेत तर विजयोत्सव सुरूच झाला होता. रावणाला इतका आनंद झाला होता की, सीतेची खात्री पटावी आणि ती शरण यावी म्हणून त्याने सीतेला पुष्पक विमानात बसवले आणि आकाशमार्गाने जिथे राम-लक्ष्मण कोसळले आहेत ते ठिकाण दाखवण्यासाठी तिला नेण्याची व्यवस्था केली. आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिल्यावर तिच्या संदेहाला जागा तरी कशी राहणार?
पण सीता सुदैवी की, तिच्याबरोबर पुष्पक विमानात त्रिजटा नावाची राक्षसी होती. तिने सीतेचा विवेक शाबूत ठेवला. विमानातून दृश्य दिसत होते की, राम-लक्ष्मण कोसळले आहेत. त्रिजटा म्हणाली की, जरी राम-लक्ष्मण निपचित पडलेले दिसत असले तरी ते मेले हे मानायला मी तयार नाही. जर ते धारातीर्थी पडले असते तर सैन्य शोकाकुल झाले असते, पण सैन्य शांत आहे. ते दोघांचे रक्षण करत आहेत आणि इथून त्या दोघांचे चेहरे दिसत आहेत. जरी जखमी असले तरी त्यांच्या चेहऱयावर चैतन्य आहे. अशा अनेक गोष्टी सांगून तिने सीतेचे मनोबल वाढवले.
युद्धात काय बातम्या पसरवल्या जात आहेत या गोष्टीला किती महत्त्व आहे याचा अनुभव आपण आजही घेत आहोत. अर्थात खोटय़ा बातम्या पसरवण्याचा आपल्याला फायदा होईल असे जरी राक्षस पक्षाला वाटत असले तरी प्रत्यक्षात काय झाले हे पाहणे महत्त्वाचे आहे. गरुडाच्या मदतीने ते मायावी नागबाण दूर करणे शक्य होऊन राम-लक्ष्मण शुद्धीवर आले. वानर सैन्य आनंदाने बेहोश होऊन जयजयकार करू लागले.
कोणतीही शहानिशा करता राम-लक्ष्मण मारले गेले म्हणून विजयोत्सवात दंग झालेल्या राक्षस सेनेला जेव्हा अचानक वानर सेनेतून आनंदाचे चित्कार ऐकू येऊ लागले तेव्हा त्यांना स्वतला सावरणेही मुश्कील झाले. सगळी सेना आनंद साजरा करत अस्ताव्यस्त पसरली होती. तिची जमवाजमव करत त्यांनी पुन्हा युद्धाची सुरुवात केली. त्यांच्या तुलनेत वानर सैन्य अधिक सावध तर होतेच, पण आता अधिक उत्साहात होते. त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता.
आज युद्धाचे तंत्र आमूलाग्र बदलले असेल, पण युद्धनीती आणि युद्ध जिंकण्याचे मानसशास्त्र आजही तेच आहे. त्यामुळे रामायणातील युद्धाचे तपशील आजही मार्गदर्शक ठरतात.
[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)