
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
कि तेन संभृतवतापि सरोवरेण लोकोपकाररहितेन वनस्थितेन । ग्राम्या वरं तनुतरापि तडागिका सा या पूरयत्यनुदिनं जनतामनांसि?
अरे सरोवरा, तू कितीही पाणी साठवून ठेवले असलेस तरी लोकांवर उपकार करण्याकडे तू पाठ फिरविली आहेस. वनात एकाकी ठिकाणी तू असल्याने तुझा लोकांना काय उपयोग? गावाच्या जवळ असलेली ती लहानशी तडागिका (तळे) तुझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरते, कारण आकाराने लहान असूनही ते रोज लोकांच्या उपयोगी पडते. केवळ मोठे असणे किंवा मोठी क्षमता असणे महत्त्वाचे नाही; ती क्षमता लोकांच्या प्रत्यक्ष उपयोगाला येते का, हेच खरे मोजमाप आहे. दूर जंगलात असलेले, कोणी वापरू न शकणारे प्रचंड सरोवर उपकार करू इच्छित असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचत नाही; उलट गावाजवळ असलेले लहानसे तळे रोजच्या जीवनात उपयोगी पडते, म्हणून तेच ख्रऱया अर्थाने उपकारक ठरते. मोठय़ा पदावर असून समाजापासून दूर राहणाऱया लोकांसाठी विशेषत विद्वान, सत्ताधारी, अधिकारी, कलाकार, कवी, नेते अशांसाठी हा उपदेश आहे. लोकाभिमुख असणे महत्त्वाचे आहे. कवी म्हणतो की समाजाच्या जवळ राहून दररोज उपयोगी पडणारे मर्यादित सामर्थ्य, हे समाजापासून तुटलेल्या भव्यतेपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते.































































