किल्ले चावंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

हजारो वर्षांपूर्वी व्यापारी मार्गावर वचक ठेवण्यासाठी सातवाहनांनी  अभेद्य गडकिल्ल्यांची शृंखलाच या भूमीत निर्माण केली. यातील एक किल्ला उंचीने काहीसा कमी व खडा कातळ असूनसुद्धा सद्यस्थितीत रेलिंग लावल्याने दुर्गप्रेमींच्या सोयीचा झाला आहे. कुकडी नदीच्या उगमस्थानाजवळ  हा  कातळकोरीव किल्ला म्हणजे किल्ले चावंड होय.

चावंड किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे-नारायणगाव-जुन्नर असा प्रवास करावा लागतो. शिवनेरी किल्ल्यापासून नाणेघाटाकडे जाणाऱ्या वाटेवर साधारण अर्ध्या तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक चावंड गड आहे. आपटाळे गावानजीक येताच उजव्या हाताला चावंड कातळकडे आपले लक्ष वेधून घेतात.  दगडात खोदलेल्या खोबणींच्या वाटेने आपणास अर्ध्या तासामध्ये गडावर सहज पोहोचता येते. रेलिंग लावलेला मुख्य कातळ टप्पा काळजीपूर्वक पार करून आपण चावंडच्या दोन कातळकडय़ांमधील घळीत असलेल्या प्रशस्त पायऱ्यांच्या मार्गापर्यंत येऊन पोहोचतो. बऱ्याच लांब, रुंद व किमान गुडघाभर उंचीच्या पायऱ्या चढताना चांगलीच दमछाक होते. पायरी मार्गाने पुढे आपण चावंड किल्ल्याच्या महादरवाजाजवळ  पोहोचतो.

प्रवेशद्वार ओलांडल्यावर कातळकोरीव पायऱ्यांचा एक टप्पा पार करून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. या ठिकाणी पूर्वी वाटेवर असलेली तोफ लाकडी गाडय़ावर व्यवस्थित मांडून ठेवलेली आहे. ही तोफ पाहून पुढे गेल्यावर आपण सदरेच्या वास्तूजवळ येतो.   पुढे पायवाटेच्या डाव्या हाताला पुरातन दगडी शौचकूप आपणास पाहावयास मिळते. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर चावंडा देवीचे मंदिर आहे. देवीला मनोभावे नमस्कार करून  माघारी फिरायचे.

खाली आल्यानंतर पूर्वेकडील पायवाटेने पुढे गेल्यावर वाटेत एक पाण्याचे टाके दिसून येते. या टाक्याच्या पुढे कमानी जवळच आपल्याला पुष्करणी पाहावयास मिळते. या पुष्करणीच्या बाजूला असलेल्या दगडी कोनाडय़ात गणेशमूर्तीसह इतर प्राचीन मूर्ती दृष्टीस पडतात. पुष्करणीच्या बाजूला भग्नावस्थेतील एक नंदी दिसून येतो. एकेकाळी गडाचे वैभव असलेली ही सुंदर पुष्करणीची वास्तू आजमितीस मात्र ढासळत चालली आहे.  पुढे गेल्यावर उत्तरेस सप्तमातृका नावाच्या पाण्याच्या टाक्या आहेत. कातळकोरीव प्रवेशद्वारामुळे या टाक्यांच्या सौंदर्यात अजून भर पडते. या प्रवेशद्वारावरसुद्धा गणपतीचे सुंदर शिल्प आहे. पाण्याने शिगोशीग भरलेल्या या टाक्यांच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या डोंगररांगाचे होणारे दर्शन आपणास सुखावून सोडते. हा टाकी समूह पाहून माघारी आल्यावर आपण पायवाटेने थोडे खाली उतरून जायचे. खाली उतरल्यावर उत्तरेकडे गडाच्या पोटात आपणास 3/4 कातळकोरीव गुहा दिसून येतात. या गुहा समूहाच्या समोरच माणिकडोह धरणक्षेत्राचे विलोभनीय दर्शन घडते. या धरणातील निळय़ाशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर निमगिरी-हनुमंत गडाचे कातळकडे, हडसरचा पर्वत, सिंदोळा, नाणेघाटाकडील वऱहाडी डोंगररांगा फारच सुंदर दिसतात. सह्याद्रीची ही नानाविध मोहक रूपं आपल्या डोळय़ांत साठवून आपण संपूर्ण गडफेरी करण्यासाठी दक्षिणेकडे मार्गस्थ व्हायचे. वाटेत आपणास पाण्याची अजून 2/3 जोडटाकी दिसतात.  असा हा शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेला चावंडचा किल्ला त्यावरील विपुल दुर्ग अवशेषांमुळे ‘प्रसन्नगड’ या त्याच्या नावानुसार आपणास प्रसन्न करून सोडतो.

‘प्रसन्नगड’ असे नामकरण

चावंड किल्ल्याच्या निर्मितीचे श्रेय जाते ते सातवाहन राजवटीला. मलिक अहमद निजामशहाने हा दुर्ग इसवी सन 1489 मध्ये बहामनी सत्तेकडून जिंकून घेतला. निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे प्रयत्नांची शर्थ करत असताना चावंड गडाचा ताबा त्यांच्याकडेच होता. इसवी सन 1636 मध्ये मूर्तझा निजामशहाला हाताशी घेऊन राजकारण करण्याचा शहाजीराजांचा डाव फसल्यावर हा गड मुघलांकडे गेला. इसवी सन 1671-72 मध्ये शिवाजी महाराजांनी जुन्नर परिसरातील जीवधन, हडसर, हरिश्चंद्रगडासोबत चावंड गडही स्वराज्यात आणला. चावंड गडाचे त्यांनी ‘प्रसन्नगड’ असे नामकरण केले. 1818 मध्ये इंग्रजांनी  चावंड गड जिंकून घेतला.