डॉ. संतोष मुंडें यांची चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरच्या संचालकपदी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

1927 पासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर मुंबई (MACCIA) या संस्थेच्या संचालक पदी डॉ. संतोष मुंडेंची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे व रवी मानगावे यांचे विशेष आभार मानले. या वेळी अध्यक्ष संतोष मंडलेजी आणि सेक्रेटरी सागर नागरे उपस्थित होते.

‘महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. त्यासाठी शेतकरी कल्याण धोरण तयार करून राबविणे हे प्राथमिक कर्तव्य असल्याचे मी मानतो. शेतकरी विरोधी कायदे बंद करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे माझे आद्य कर्तव्य असेल. महाराष्ट्रातील लघुउद्योगक्षेत्रावर जास्त लक्ष देणे गरचेचे आहे, तसेच अशा एमसीसीआयए मार्फत चालणाऱ्या उपक्रमांमधून जी चर्चा होईल, शासनाकडे ज्या सूचना केल्या जातील त्यांच्यावर काम करून राज्याच्या औद्योगिक विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी मी बांधील आहे तसेच इतर राज्यांकडून होणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कुठली पावले उचलली जावीत यावर विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निवडीनंतर डॉ. संतोष मुंडेंनी सांगितले.

आजवर एमएसीसीआयएने महाराष्ट्राच्या विविध प्रांतांच्या नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य दिले आहे. राज्यात औद्योगीक वसाहतींच्या निर्मितीत आणि विकासात एमएसीसीआयएने मोठा हातभार लावला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अण्ड अग्रिकल्चर हि व्यापारी, उद्योजकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. चेंबरचे राज्यात 7000 व्यापारी-उद्योजक सभासद असून 600 पेक्षा जास्त संघटना सदस्य आहेत. जास्तीतजास्त चांगली, अद्यावत आणि परिपूर्ण माहिती देण्याचा एमएसीसीआयएनेचा नेहमी प्रयत्न असतो. सर्वाना विविध प्रकारची माहिती देण्यासाठी दर महिन्याला शक्यतो एखादी मध्यवर्ती संकल्पना घेऊन दर महिन्याला चेंबर विविध कार्यक्रम आयोजित करीत असते.

शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करणे तसेच शक्य त्याप्रकारे संबंधितांना सरकारी पातळीवरून सहकार्य उपलब्ध करून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट समोर ठेऊन डॉ. संतोष मुंडे कार्यरत राहतील यात शंकाच नाही. त्यांच्या निवडीच्या माध्यमातून परळी वैजनाथच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यामुळे डॉ. संतोष मुंडेंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.