अवघ्या महाराष्ट्राला चटका… आनंदवन दु:खात बुडाले; शीतल आमटे यांची आत्महत्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sheetal-amte

दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक, कर्मयोगी डॉ. बाबा आमटे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेणाऱया प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. वरोरा येथील ‘आनंदवन’ येथे राहत्या घरी विषाचे इंजेक्शन टोचून त्यांनी आयुष्य संपवले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा आहे. डॉ. विकास आमटे यांची कन्या असलेल्या शीतल यांची आत्महत्या अवघ्या महाराष्ट्राला चटका लावणारी आहे. ‘आनंदवन’ परिवारावर शोककळा पसरली असून, दुःखात बुडाले आहे.

घटना घडली तेव्हा शीतल यांचे वडील डॉ. विकास आणि आई डॉ. भारती हे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात गेलेले होते. आनंदवनमध्ये शीतल, त्यांचे पती गौतम करजगी व सासरे होते. मानसिक तणावातून डॉ. शीतल यांनी हे कृत्य केले असावे, असे सांगण्यात येते. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतले हे लक्षात येताच त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात त्यांचे पार्थिव नेण्यात आले. शीतल यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी ‘आनंदवन’ला भेट दिली. शवविच्छेदन अहवाल आणि न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आत्महत्येचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शीतल यांच्या आत्महत्येने सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

फेसबुक पोस्ट आणि कुटुंबाचे पत्रक

गेल्या आठवडय़ात डॉ. शीतल यांनी फेसबुक पोस्ट टाकली होती. पण काही वेळातच डिलीट केली होती. त्यानंतर आमटे परिवाराने एक पत्रक जारी केले होते. या पत्रकावर डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या पत्रकातील मजकूर असा होता, ‘आनंदवन, लोक बिरादारी प्रकल्प, सोमनाथ, महारोगी सेवा समिती इत्यादी संस्थांची समाजविकासाची बांधणी निरपेक्ष भावनेतून करण्यात आली आहे. आमचे संपूर्ण आमटे कुटुंब या कामाशी मागील तीन पिढय़ांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल गौतम करजगी यांनी आमच्या संस्था कार्यात योगदान दिले आहे. तथापि डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण, नैराश्य यांचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुली देत म.से.स. या संस्थेच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल अनुचित वक्तव्ये केली. त्यांचे भाष्य तथ्यहीन आहे. शीतल करजगी यांच्या निवेदनामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार संयुक्त निवेदन जारी करीत आहे.’ असे या निवेदनात म्हटले होते.

कुटुंबातील कलह आणि नैराश्य

डॉ. बाबा आमटे यांच्या समाजसेवेचा वारसा तिसरी पिढी सांभाळत आहे. याचे नेतृत्व शीतल आमटे-करजगी करीत होत्या. ‘आनंदवन’ची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. डॉ. बाबा आमटे यांनी 1949 साली स्थापन केलेल्या ‘आनंदवन’ येथील महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होत्या. काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात वाद सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या. काही माध्यमांनी हा संघर्ष उचलून धरत भडकवण्याचेही काम केले. या वादाच्या केंद्रस्थानी डॉ. शीतल होत्या. त्यांना डिप्रेशन आले होते. त्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले, असा अंदाज आहे.

बाबांच्या समाधीशेजारीच…

पोलिसांनी डॉ. शीतल आमटे यांची खोली सील केली आणि पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला घेऊन गेले. शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आणि सायंकाळी उशिरा ‘आनंदवना’तील बाबा आमटे यांच्या समाधी शेजारीच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘वॉर अॅण्ड पीस’

आत्महत्येपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी ट्विटरवर एक पेंटिग शेअर केले आहे. हे पेटिंग त्यांनी स्वतः काढले होते. 29 नोव्हेंबर 2020 अशी तारीखदेखील आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘War and Peace’ म्हणजे ‘युद्ध आणि शांतता’ अशी सूचक कॅप्शन दिली होती.