Video – डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरण; श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक महिना उलटूनही आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत पोलीस तपासात अल्प प्रगती दिसत आहे. चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष उघड करण्यात आला. व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत राखून ठेवल्याची माहिती देण्यात आली.

डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची महत्वपूर्ण  माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. याआधी जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी नवी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली असून घटनास्थळी कुठलीही सुईसाइड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आलाय. डॉ. शीतल यांच्या मृत्यूबाबत महत्वाचा खुलासा करू शकणारे त्यांचे टॅब, मोबाईल आणि लॅपटॉप यांचा मुंबई प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

अल्सर झालेल्या डॉ. शितल यांच्या पाळीव कुत्र्यांना संपवण्यासाठी त्यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले होते. त्यातील एक रिकामे अँपुल मिळाल्याचा खुलासा चौकशीदरम्यान झाला आहे. मृत्यूसंदर्भातील विविध अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान पत्रपरिषदेत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कॅमेऱ्याने पहिल्या काही मिनिटानंतर चित्रिकरणास बंदी घालण्यात आली होती.