
दादरच्या इंदू मिलमध्ये उभारण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाची रखडपट्टी सुरू आहे. सरकार किंवा कंत्राटदाराकडून स्मारकाच्या कामाची योग्य ती जबाबदारी घेतली जात नाही. रखडपट्टी करणाऱ्या कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, स्मारकाची होत असलेली रखडपट्टी थांबणार कधी, असा जाब विचारत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे येथील बीकेसीत एमएमआरडीएच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मारकाच्या रखडपट्टीबद्दल आज एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांना जाब विचारत स्मारकाच्या कामात होत असलेली दिरंगाई थांबवून लवकरात लवकर स्मारक पूर्ण करून मुंबईसह देशभरातील भीम अनुयायांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी, आंबेडकर चळवळीतील आणि इंदू मिल आंदोलनातील कार्यकर्त्यांनी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांकडे दिले.
अनिल देसाई यांचाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी होणाऱ्या विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला होता.
बाबासाहेबांच्या कर्मभूमीतच स्मारकाला विलंब का?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन राज्यांतील स्मारके अत्यंत कमी वेळात बनून पूर्ण झाली आहेत, मग 2014 मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले असताना केंद्र आणि राज्यांकडून निधी पुरवला जात असताना, स्मारकांच्या कामावर लक्ष ठेवले जात असतानाही डॉ. बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या मुंबईत स्मारकाची रखडपट्टी का होत आहे? केंद्र व राज्य सरकार स्मारकाची रखडपट्टी जाणूनबुजून करत आहे का, असा सवाल शिवसेना पक्ष संघटक विलास रूपवते यांनी केला आहे.
मिंधे सरकार अजून झोपलेलेच
बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठक एमएमआरडीएने वर्षभर घेतली नव्हती. त्यामुळे कंत्राटदाराकडून स्मारकाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे उघड झाले होते. याबाबत दैनिक ‘सामना’ने भाजप आणि मिंधे सरकारने राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घोर उपेक्षा केल्याची बातमी 14 जूनला प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काही प्रमाणात स्मारकाच्या कामासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, नंतर सर्व ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’सारखे चित्र दिसू लागले आहे.



























































