
सामना प्रतिनिधी, शेवगाव
पक्षीय मतभेद विसरून दुष्काळाशी सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडले. शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे, ज्येष्ठ नेते वसंत कापरे, दिलीप राव लांडे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, शिवसेनेचे जिल्हा नेते बाबुशेठ टायर वाले, नगराध्यक्ष विनोद मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अजय भारस्कर, अरुण मुंडे, सागर फडके, अशोक आहुजा, शहराध्यक्ष रवी सुरवसे, बंडू शेठ रासने, मंदार मुळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. विखे म्हणाले, शेवगाव तालुक्यात सध्या पाणीप्रश्न हा उग्र स्वरूप धारण करत असून त्यावर कशा पद्धतीने मात करता येईल. यासाठी प्रथम प्राधान्य राहील. आगामी पाच वर्षात काळात मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लोकसभा मतदारसंघात समन्वय समितीच्या माध्यमातून दर सहा महिन्याला बैठका घेतल्या जातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न अडचणी याबाबत लेखी स्वरूपात नागरिकांचे अर्ज मागविले जातील, असं डॉ. विखे म्हणाले.
चारा छावणीच्या संदर्भात ते म्हणाले की, आपण कोणत्याही बाबतीत पक्षपातीपणा करणार नाही. मात्र छावणी चालकांना टॅगिंग करण्यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र त्या शौर्य कंपनीचा प्रतिनिधी सापडत नसल्याने मोठा गोंधळ बघायला मिळतोय. जबाबदारी टाळणाऱ्या त्या कंपनी च्या बाबत तहसीलदारांनी कारवाई करावी. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले, चारा छावणी चालकांना बाबत आवाज उठवणारा मी एकमेव असल्याचे ते म्हणाले येत्या दहा दिवसात छावणी चालकांना त्यांच्या मूळ रक्कम व्याजासह पैसे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही ते म्हणाले सत्तेचा उपयोग समाजासाठी केला गेला पाहिजे. टँकरमुक्त नगर जिल्हा करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवली गेली पाहिजे तसेच म्हणजे पुढच्या पिढीला पिण्याच्या पाण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. वाड्यावस्त्या, गावे यांना टँकरची तातडीने सुविधा पुरवण्याची सूचना प्रांत अधिकारी तहसीलदार यांना केली.
कोकणाकडे जाणारे पाणी वळवणार
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोकणाकडे पाणी वाहत जाऊन ते समुद्राला मिळते, ते पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी आपण मुख्य भूमिका घेणार असून त्यातून गोदावरी खोऱ्यातील जनतेला सुजलाम सुफलाम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
नवी भरारी शासन आपल्या दारी
तहसील कार्यालयात कुपन संदर्भात मोठ्या तक्रारी या टंचाई आढाव्यात नागरिकांनी मांडल्या. त्यावर बोलताना डॉ.विखे यांनी तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेला मोफत कुपन देण्याचे आश्वासन देऊन नवी भरारी शासन आपल्या दारी या संकल्पनेचा तहसील कर्मचाऱ्यांना संकल्प घालून दिला.




























































