दशावतार पेटारा उलगडणार, डॉ. तुळशीदास बेहरे यांचा संशोधन ग्रंथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दशावतार ही कला म्हणजे कोकणच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. हा सांस्कृतिक ठेवा पुस्तकरूपाने कलाप्रेमींसमोर येणार आहे. दशावतार कलेचे अभ्यासक डॉ. तुळशीदास बेहरे यांचा दशावतार आणि यक्षगान या लोककलांवर आधारित संशोधन ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार, 14 मार्च रोजी होणार आहे. डॉ. बेहरे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रा. रेखा बेहरे यांच्या अथक प्रयत्नातून ही गंथसंपदा प्रकाशित होत आहे.

डॉ. तुळशीदास बेहरे यांनी आयुष्यभर दशावतार कलेचा ध्यास घेतला. त्यांनी कोकणातील दशावतार आणि कर्नाटकातील यक्षगान यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन करून 2005 साली मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त केली. पूर्वीच्या संशोधकांचे म्हणणे होते की दशावतार कला कर्नाटकातून आली. मात्र हा मुद्दा बेहरे यांनी संशोधनाअंती खोडून काढला.

त्या संशोधनावर आधारित 225 पानांचा ग्रंथ आता प्रकाशित होणार आहे. प्रा. रेखा बेहरे आणि मनोहर बोर्डवेकर यांनी संपादन केले आहे. प्रकाशन रविवारी मिनी थिएटर, पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी 7 वाजता हा होईल.

संवर्धनाची गरज

कर्नाटकात यक्षगानावर संशोधन करून अभ्यास केंद्रे उभारण्यात आली आहेत. तिथे यक्षगानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. मात्र दशावताराच्या बाबत असे काहीच नाही, याची खंत डॉ. तुळशीदास बेहरे यांना वाटत होती. दशावतार कलेवर अनेक लोकांनी संशोधन करावे, तिचे संवर्धन व्हावे, त्यामध्ये नवनवे प्रयोग व्हावे, असे डॉ. बेहरे यांना वाटत होते. हाच त्यांच्या पुस्तकलेखनाचा उद्देश होता, असे रेखा बेहरे यांनी सांगितले.

दशावतार- यक्षगानातील साम्य आणि भेद

दक्षिण कोकणातील दशावतार, आणि उत्तर कर्नाटकातील यक्षगान यामधील साम्य आणि भेद या ग्रंथाने दाखवून दिलाय. याविषयी अधिक माहिती सांगताना रेखा बेहरे म्हणाल्या, दोन्ही कला आहेत. दोन्ही भक्तीनाटय़ं आहेत. मनोरंजन आणि देवतांचे तुष्टीकरण हा दोन्हींचा उद्देश आहे. मात्र दोन्हीचे सादरीकरण वेगळे. दशावतारात रामायण, महाभारत, पुराणातील कथानक आहे. यक्षगानातही तेच आहे. पण यक्षगानात लिखित संहिता आहे. यक्षगानात शास्त्राrय संगीत आणि शास्त्राrय नृत्याचा वापर होतो. उलट दशावतारात लोकसंगीत वापर आहे, लोकनृत्य आहेत. दशावतार प्रयोग मौखिक पद्धतीचा असतो.