दीपावलीचे ऐतिहासिक संदर्भ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वा. ल. मंजूळ

दीपावलीचा हा सण धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रभावाखाली संघटित होऊन एक मोठा दीर्घकाळ चालणारा उत्सव म्हणून हिंदू जीवनात स्थान स्वीकारून बसला आहे. प्रांत आणि भाषापरत्वे त्यामध्ये काही चाली, रुढी वेगवेगळ्या असतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपोत्सव करून अंधाराचा नाश करणे, धार्मिक विधीतून देवादिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, राजेरजवाडे प्रजेविषयी प्रेम व्यक्त करणे यासाठी ही एक चांगली संधी मानत असत. नव्या जमान्यात आनंदाच्या कल्पना बदलल्या, पण दिवाळीचे आनंदोत्सवाचे स्वरूप तेच राहिले आहे. इसवीसनाच्या आरंभापासून हा सण साजरा करण्याची पद्धत रूढ आहे.

सण हा मराठी शब्द संस्कृत शब्द ‘क्षण’पासून तयार झाला आहे. क्षण-छण-सण अशी त्याची व्युत्पत्ती आहे. ऋग्वेद काळापासून वेगवेगळ्या ऋतूत अनुरुप उत्सव करण्याची प्रथा होती. उत्सवाला समन म्हणत असत. दीपावली-दिवाळी हा सर्व सणांचा-उत्सवांचा राजा म्हटला पाहिजे. धार्मिक-सामाजिक आणि काwटुंबिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा. जवळजवळ एक आठवडा चालणारा हा दीपोत्सव हिंदू जीवनात आनंदाचा बहर निर्माण करतो. दिवाळीच्या या सणाला सुमारे दीड ते दोन हजार वर्षांची परंपरा आहे. इसवीसनाच्या आरंभापासून हा सण साजरा करण्याची पद्धत रूढ आहे. तेव्हापासूनचे स्वरूप कसे ते थोडक्यात पाहणे रंजक ठरेल.

कामसूत्रामध्ये वात्स्यायनाने (इ.स. 50 ते 400 या काळात) यक्षरात्री उत्सवाचा उल्लेख केला आहे. हेमचंद्र या व्याकरणकाराने त्यालाच ‘जखरत्ती’ म्हटले आहे. हा उत्सव दीपालिका-म्हणजे दिवाळीचाच उत्सव मानला जात असे. हर्षाच्या नागानंद नाटकात (इ.स. 606) त्याने ‘दीपप्रतिपद्- उत्सव’ वर्णिला आहे. विशेष म्हणजे आधुनिक दिवाळसणासारखा ‘जावयाचा सन्मान उंची कपडे आणि दागदागिने देऊन करावा’ असे त्यामध्ये म्हटले आहे.

सोमदेव सरी या जैन ग्रंथकाराने आपल्या ‘यशस्तिकलचंपू’ या गद्य काव्यात मालखेडच्या राष्ट्रकुट राजाच्या काळातील दीपावलीच्या उत्सवाचे वर्णन केले आहे. अल्वेरुणी नावाचा एक प्रवासी इ.स. 1030 मध्ये भारतात येऊन गेला. भारतातील लोकजीवनाचे वर्णन त्याने आपल्या ‘ताहकिक-इ-हिंद’ या ग्रंथात केले आहे. भारतात साजऱया होणाऱया दिवाळी सणाचे सविस्तर वर्णन त्याने यात दिले आहे. ‘आकाशभैरव’ नावाचा एक शैवांचा तंत्र ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला गेला आहे. त्यामध्ये दीपोत्सवाच्या काळात कोणत्या दिवशी काय विधी करावा आणि त्याचे काय फल मिळेल हे दीपावलीच्या धार्मिक विधीचे सविस्तर वर्णन दिले आहे. शिव-पार्वतीच्या संवादातून या ग्रंथाची रचना झाली आहे. नरेंद्रविने मराठीमधून इ.स. 1292 मध्ये ‘रुमिणी सैंवर’ (रुॊिमणी स्वयंवर) नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये विदर्भातील दीपावलीचे रसभरित वर्णन दिले आहे. श्रीपतीच्या ‘ज्योतिषरत्नमाला’ या इ.स. 1039 साली मराठीतून लिहिलेल्या ज्योतिष ग्रंथात कार्तिक शुल नवमीला दीपावलीचा मुख्य दिवस मानला आहे.

महानुभवांच्या साहित्यात दीपावलीचे वर्णन वेगळ्या पद्धतीने आले आहे. महानुभावांच्या ‘लिळाचरित्रात’ इ.स. 1250) चक्रधर स्वामींची शिष्या महदांबानें हिवरली (आधुनिक जालना) येथे साजऱया केलेल्या दीपावली उत्सवाचे वर्णन केले आहे. त्यात भाऊबीजेला मोदक, सेव ही पक्वान्ने खाण्यासाठी तयार केली असल्याचे म्हटले आहे. मराठीतला ललामभूत ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांचा ‘भावार्थ दीपिका’ तथा ज्ञानेश्वरी या ग्रंथात दीपावली वर्णनाचे दोन-तीन उल्लेख आहेत. त्यातील महत्त्वाचा संदर्भ म्हणजे ‘सूर्ये अधिष्ठली प्राची। जगा राणीव दे प्रकाशाची। तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची। दिवाळी कर।’ हा संदर्भ दीपावलीचे तत्कालीन समाजातील स्थान चटकन सांगून जातो.

मेरुतुंगाचार्य या संस्कृत ग्रंथकाराने आपल्या ‘प्रबंधचिन्तामणि’ या ग्रंथात इ.स. 1305 मध्ये कोल्हापूरच्या राजांनी ज्या पद्धतीने दिवाळी साजरी केली त्याचे वर्णन केले आहे. ‘ऐन अकबरी’ या पर्शियन ग्रंथात (इ.स. 1590) दिल्लीतील मोगल कालीन दीपावलीचे वर्णन आणि या उत्सवात अकबराने कसा भाग घेतला याचे वर्णन केले आहे. दीपावलीचा हा इतिहास पाहिल्यानंतर प्रत्येक दिवसाच्या धार्मिक सामाजिक वैशिष्टय़ाचा विचार करू. पंचांगाप्रमाणे अश्विन वद्य द्वादशी (वसुबारस), धनत्रयोदशी (धनतेरस), नरकचतुर्दशी, आमावास्या, (लक्ष्मीपूजन), पाडवा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीज (यमद्वितीया)असे सहा दिवस महत्त्वाचे होत. शास्त्राsक्तदृष्टय़ा त्रयोदशी, चतुर्दशी आणि आमावास्या हेच तीन महत्त्वाचे दिवस होत.

दीपावलीचा हा सण धार्मिक समाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रभावाखाली संघटित होऊन एक मोठा दीर्घकाळ चालणारा उत्सव म्हणून हिंदू जीवनात स्थान स्वीकारून बसला आहे. प्रांत आणि भाषा परत्वे त्यामध्यें काही चाली, रुढी वेगवेगळ्या असतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपोत्सव करून अंधाराचा नाश करणे, जीवनाची मरगळ टाकून उत्साहित होणे. शरीर सजविण्यासाठी अभ्यंग स्नान, नवीन वस्त्रालंकलार धारण करणे, नातेवाईकांना भेटणे, वेगवेगळ्या खेळांनी मन रमविणे, सडे-रांगोळ्या यांनी घरे सजविणे, आप्त स्वकियांसह नवनवीन पक्वांन्नाचा स्वाद घेणे, सामाजिक जाणिवेतून पाळीव प्राण्यांचा दिवस साजरा करणे, धार्मिक विधीतून देवादिकांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करणे, राजेरजवाडे प्रजेविषयी प्रेम व्यक्त करणे यासाठी ही एक चांगली संधी मानत असत. दीपावलीचे पाचही दिवस वैशिष्टय़पूर्ण विधीने साजरे करीत. नव्या जमान्यात आनंदाच्या कल्पना बदलल्या पण दिवाळीचे आनंदोत्सवाचे स्वरूप तेच राहिले आहे. अलीकडे या सणांचे स्वरूप आणखी वेगळ्या पद्धतीने पुढे येऊ लागले आहे. कार्यालयीन कामांना सर्वांनाच सुटी असल्याने परगावी जाऊन, प्रवास करून एकत्रित कुटुंबीयांनी आनंदयात्रा करण्याच्या कल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. एके काळी खाण्या-पिण्यात, नवीन खाद्य पदार्थ तयार करण्यात वेळ घालणाऱया गृहिणी बाहेरचे तयार पदार्थ विकत घेण्याची कल्पना स्वीकारू लागल्या आहेत. त्यामुळे पुरुषांच्या-बरोबरीने घराबाहेर महिला पडू लागल्या आहेत. नवनवीन वस्तूंची खरेदी करून ऐहिक जीवनात आनंद आणि सुख सोय निर्माण करण्याचा काळ म्हणून दिवाळीच्या सणाचा वापर होऊ लागला आहे. दिवाळीचे काळानुसार बदलाणारे स्वरूप वाईट की सोयीचे की गैरसोयीचे हे मत व्यक्तीसापेक्ष आहे. ते ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. जुन्या धार्मिक चौकटीतून दिवाळी सुटून सामाजिक आनंदोत्सवात बदलत आहे. एवढे मात्र खरे!