नालेसफाईवर करडी नजर, फिल्डवर उतरण्याचे आयुक्तांचे सहाय्यक उपायुक्तांना निर्देश

मुंबईत नालेसफाई परिणामकारक होण्यासाठी सहाय्यक आयुक्त आणि संबंधित परिमंडळाच्या उपायुक्तांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे, असे निर्देश आज पालिका आयुक्त – प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले. शिवाय मुंबईच्या सौंदर्यीकरणाची शिल्लक असलेली 50 टक्के कामे वेगाने पूर्ण करावीत असे आदेशही आयुक्तांनी दिले.

मुंबई सौंदर्यीकरण आणि पावसाळापूर्व कामांबाबत पालिका आयुक्तांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेऊन कामे पूर्ण करण्यासंदर्भात सूचनाही केल्या. मार्च महिन्यात नुकताच झालेला पाऊस हा मागील आठ दशकांमध्ये महिन्यात झालेला सर्वाधिक पाऊस ठरला. वातावरणीय बदलांमुळे हवामानाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जगाला बसतो आहे आणि मुंबईलाही त्याचे अनुभव येत आहेत. अशा स्थितीत यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील लहान-मोठय़ा सर्व नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने आणि योग्य रीतीने पूर्ण करावीत, जी-20 परिषद – मुंबई सुशोभीकरण व नियमित देखभालीच्या कामांचा आढावा घेऊन कामे जलदगतीने करावीत, असे निर्देशही आयुक्तांनी प्रशासनाला दिले.

मुंबईत विभागनिहाय होणार मातृशक्ती मेळावे
राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरांमध्ये सरकार आपल्या द्वारी – मातृशक्ती महिला मेळावे दिनांक 14 एप्रिलपासून आयोजित होणार आहेत. प्रत्येक विभाग स्तरावर होणाऱया या महिला मेळाव्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून महिलांच्या सूचना, तक्रारी ऐकून घेण्यात येतील. यानिमित्ताने मेळाव्याला येणाऱया महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे, समन्वयसाठी प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर एका महिला अधिकाऱयाची नेमणूक करण्याच्या सूचनाही या वेळी आयुक्तांनी दिल्या.

पाच हजार स्वच्छतादूत नेमणार
मुंबईतील प्रसाधनगृहांबाबत आयुक्तांनी या वेळी आढावा घेतला. मुंबईत 5 हजार स्वच्छतादूत नेमण्याच्या दृष्टीने धोरण ठरल्यानंतर आता स्वच्छता दूतांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही आयुक्तांनी या वेळी दिली. एप्रिल अखेरपर्यंत सर्व स्वच्छतादूत नेमले जातील, अशा रीतीने प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.