
सामना प्रतिनिधी । लातूर
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या माध्यमिक शाळांतील मुलांच्या पर्यावरण विषयक विभागीय एकांकिका स्पर्धेचे या वर्षीपासून रंगकर्मी श्रीराम गोजमगुंडे पर्यावरण एकांकिका स्पर्धा असे नामकरण करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी दगडोजीराव दादा देशमुख सांस्कृतिक सभागृहात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती मनोज पाटील, गटविकास अधिकारी तृप्ती अंधारे, प्राचार्य डी.एन. केंद्रे, अविष्कार गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता खेळ, नृत्य आणि नाट्य या विषयातही पारंगत असणे गरजेचे आहे. त्यातूनच अष्टपैलू व्यक्तीमत्व निर्माण होऊ शकते. मी आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये सातत्याने विविध मैदानी आणि कलात्मक स्पर्धांमध्ये सहभागी होत होतो. त्यातूनच आज जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलो. लातूरला श्रीराम गोजमगुंडे यांच्या रुपाने मोठे कलावंत लाभले. त्यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासणे गरजेचे आहे. मुलांनी विविध स्पर्धेत सहभागी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरण टिकले तर जग टिकेल तेव्हा मुलांच्या मनामध्ये लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व वाढविणाऱ्या या पर्यावरण एकांकिका स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळाही आता स्पर्धेत उतरत असून तीन वर्षापासून जिल्हास्तरावरती जिल्हा परिषदेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये जिल्हा परिषद शाळेची मुले सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे मुलांचे व्यक्तीमत्व सुधारण्यास मदत होत आहे. पर्यावरण संवर्धन हा आमचा महत्त्वाचा विषय बनला असून लातूरमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये त्यामुळेच आमच्या शाळेची मुले उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, इकोफोक्स संस्था मुंबई, गरवारे कम्युनिटी सेंटरचे बालभवन आणि जनरंग अकादमी लातूरच्या वतीने 12 वर्षांपासून पर्यावरण विषयक एकांकिका स्पर्धेचे आयोजन लातूर येथे करण्यात येते. येथे विजेत्या ठरणाऱ्या प्रथम आणि द्वितीय संघाला विभागीय पातळीवरती संभाजीनगर येथे होणाऱ्या मराठवाडास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळतो. या वर्षी या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध माध्यमिक शाळांच्या संघासह महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या संघांनी आपला सहभाग नोंदवत पर्यावरणाचा जागर घातला.





























































