
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानने उपग्रह-रोधी क्षेपणास्राचे यशस्वी परीक्षण केले होते. ब्रह्मांडामध्ये अंतराळ कचरा होऊ नये याची काळजी हिंदुस्थानलाही आहे. म्हणूनच या परीक्षणासाठी हिंदुस्थानने खालची कक्षा निवडली होती, असा खुलासा डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी केला. ‘मिशन शक्ती’मुळे हिंदुस्थान 1 हजार किलोमीटर परिसरात असलेल्या शत्रूच्या उपग्रहाचा नाश करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले होते, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
उपग्रहाचा भेद करण्याचे परीक्षण घ्यायचे तेव्हाच त्यासाठी जमिनीपासून 300 किलोमीटर उंचीवरील कक्षा निवडण्यात आली. याचा उद्देश्य अंतराळ कचरा होऊ नये हाच होता. हिंदुस्थानने केलेल्या परीक्षणानंतर निर्माण झालेला कचरा काही आठवड्यांतच नष्ट होणार आहे, असेही रेड्डी पुढे म्हणाले.

























































