
मेमरी कार्ड बॉक्सच्या नावाखाली महागडय़ा आयफोन तस्करीचा डीआरआयने पर्दाफाश केला आहे. डीआरआयने कारवाई करून सुमारे 42 कोटी 86 लाख रुपये किमतीचे 3 हजार 646 आयफोन जप्त केले आहे. या वर्षातील डीआरआयची मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
मेमरी कार्डच्या बॉक्सच्या नावाखाली आयफोनची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअरकार्गोमध्ये डीआरआयचे पथक गेले. त्या पथकाने हाँगकाँग येथून आलेले दोन कंसाइन्मेंट उघडले. त्या कंसाइन्मेंटच्या बॉक्सवर मेमरी कार्ड असे लिहिले होते. त्या बॉक्सची तपासणी केली असता त्यात महागडे आयफोन होते. डीआरआयने कारवाई करून 2,245 आयफोन 13 प्रो, 1,401 आयफोन प्रो मॅक्स आणि 12 गुगल पिक्सेल 6 प्रो असे 3 हजार 646 फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या त्या फोनची किंमत सुमारे 42 कोटी 86 लाख रुपये होती. मात्र त्या बॉक्सवर मेमरी कार्डची किंमत 80 लाख रुपये इतकीच दाखवण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानात आयफोन 13 चे मॉडेल विक्रीला सुरुवात झाली होती. त्याची मूळ किंमत 70 हजार रुपये असून इतर मॉडेलची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे.

























































