बेंगळुरू विमानतळावर ५ कोटींचे सोने जप्त, शरीराच्या गुप्त भागात लपवून चालली होती तस्करी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी पाच तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांनी ज्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून सुरक्षा यंत्रणाही थक्क झाल्या आहेत.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले पाचही आरोपी बांगलादेशमार्गे हिंदुस्थानात आले होते. विमानतळावरील स्कॅनिंग आणि सुरक्षा यंत्रणेला चकवा देण्यासाठी त्यांनी सोन्याची पावडर (पेस्ट) आणि कॅप्सूल तयार केले होते. हे सोन्याचे कॅप्सूल त्यांनी आपल्या शरीराच्या गुप्त भागात लपवून ठेवले होते. मात्र, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक पाळत आणि गुप्त माहितीच्या आधारे या तस्करांना ताब्यात घेतले. त्यांची कसून तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

प्राथमिक तपासानुसार, हे आरोपी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता आहे. हे सोने कोठून आणले आणि ते कोणाला वितरित केले जाणार होते, याचा तपास आता डीआरआय करत आहे.