दृश्यम- 3 ची प्रदर्शनाआधी कोटींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दृष्यम या सिनेमाने बाॅलिवुडमध्ये स्वतःची चांगलीच ओळख निर्माण केली आहे. दृश्यमच्या याआधी आलेल्या दोन्ही भागांनी  प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. आगामी दृश्यम 3 ने रिलिजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तगडी कमाई केलेली आहे. यावरूनच समजते की, मोहनलाल यांच्या दृश्यमला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या प्री-सेल्सने केरळमध्ये 1 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तसेच, जगभरातील अॅडव्हान्स बुकिंगची कमाई 4 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. विशेष बाब म्हणजे, चित्रपटाची पूर्ण तिकीट विक्री अद्याप सुरू झालेली नसतानाही हा आकडा गाठण्यात आला आहे.

बहुप्रतिक्षित ‘दृश्यम ३’ चा ट्रेलर शनिवारी कोची येथे प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, जीतू जोसेफ यांनी सांगितले की, यावेळी जॉर्जकुट्टीला एका पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागेल. ते म्हणाले, “पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांमधील फरक हा आहे की, जॉर्जकुट्टीला हे माहीत नाही की कोणी त्याच्या मागे लागलं आहे का, आणि जर लागलं असेल, तर कोण?” दिग्दर्शकाने पुढे सांगितले, “पहिल्या दोन भागांमध्ये, त्याला माहीत होतं की पोलीस आणि मृत मुलाचे कुटुंब त्याच्या मागे लागले आहेत. पण या भागात, त्याला हे माहीत नाही की कोण त्याच्या मागे लागलं आहे.” असे वृत्त एबीपीने दिले आहे.

ट्रेलर लाँचच्या वेळी, मोहनलाल यांनी संकेत दिले की जॉर्जकुट्टीची कथा या पुढेही चालू राहू शकते. याचा अर्थ चौथा भाग देखील येण्याची शक्यता असल्याचे मोहनलाल यांनी अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे. ‘दृश्यम 3’ 21 मे 2026 ला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.