
नार्कोटिक डीपार्टमेंटमध्ये पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत कारचालकाची ऑनलाइन फसवणूक करीत महिलेने पोबारा केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुंबई येथील नार्कोटिक डीपार्टमेंटमध्ये तपासकामी जायचे आहे, असे सांगत एका महिलेने कार भाड्याने केली. मुंबईत गेल्यावर रोख पैसे देते, असे सांगून कारचालकाकडून 25 हजार रुपये ऑनलाइन घेतले. मुंबईत गेल्यावर उसने घेतलेले पैसे तसेच गाडीभाडेही न देता मोबाईल बंद करून महिलेने पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने ऑनलाइन 25 हजार आणि भाडय़ाचे 7200 अशी 32 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. या महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैसल अली अजगर पीरमोहम्मद झाडा (वय 30, रा. नालसाब चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फैजल फिर्यादी टूर्स अॅण्ड ट्रव्हल्सचा व्यवसाय आहे. 21 नोव्हेंबर रोजी त्यांना मोबाईलवर एका महिलेने फोन केला. तिने स्नेहा सरे असे नाव सांगत आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात नार्कोटिक्स डीपार्टमेंटमध्ये उपनिरीक्षक आहोत, असे सांगितले. मुंबईतील नार्कोटिक्स डीपार्टमेंट कार्यालयात तपासकामासाठी जायचे आहे आणि पुन्हा अहिल्यानगरला परत यायचे आहे, असे सांगत कार बुक केली. फैजल याला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये कार घेऊन बोलावत कार स्वारगेट पोलीस स्टेशन येथे घ्यायला लावली. तेथून मुंबईला नेत वाटेत तिने ‘तुमच्याकडे ऑनलाइन पैसे आहेत का? मी मुंबईत गेल्यावर तुम्हाला रोख पैसे देते,’ असे फैजलला सांगितले.
फिर्यादी यांना सदर महिला खरंच पोलीस अधिकारी असल्याची खात्री झाल्याने त्यांनी 25 हजार रुपये तिला फोन-पे वर पाठविले. त्यानंतर तिने कार वाशी सेक्टर 9 येथे घ्यायला लावली. तेथे उतरल्यावर ‘कार पार्किंगमध्ये पार्क करा, मी काही वेळात येते,’ असे सांगून ती महिला गायब झाली. थोड्या वेळाने फिर्यादी यांना मोबाईलवर मेसेज पाठवून, ‘दादा तुम्ही नगरला जा, मी दोन, तीन दिवसांत तुम्हाला पैसे ऑनलाइन पाठविते’, असे सांगून मोबाईल बंद केला.
बराच वेळ संपर्क साधूनही त्या महिलेचा मोबाईल स्वीच ऑफ लागल्याने फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, या नावाची कोणतीच महिला अधिकारी नसल्याचे समजले.
‘त्या’ महिलेवर फसवणुकीचे 13 गुन्हे
फिर्यादी फैजल अली आणि पोलिसांनी त्या महिलेबाबत अधिक माहिती घेतली असता, ती 22 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आली. तिने स्वागत कक्षात ‘व्हिजिटर्स बुक’मध्ये आपले नाव स्नेहा दिलीप सातपुते असे नोंदवले असल्याचे आढळून आले. तिच्याविरुद्ध दाखल गुह्यांच्या अभिलेखाची पडताळणी केली असता, ‘त्या’ महिलेवर राज्यभरात अशाप्रकारे फसवणुकीचे 12-13 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.




























































