विनावाहक ‘बेस्ट’मुळे फुकट्यांची सोय, शेकडो प्रवाशांची गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’ प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या विनावाहक बससेवेमुळे फुकट्यांची चांगलीच सोय झाली असून शेकडो प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. शिवाय दररोज ‘बेस्ट’चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रशासनाने ‘बेस्ट’ समिती सदस्यांना विश्वासात न घेता या उपक्रमाची अंमलबजावणी केल्यामुळे शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ‘बेस्ट’ प्रशासनाने विनावाहक बससेवा सुरू केली. यामध्ये ‘बेस्ट’च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील शेकडो बस विनावाहक चालवल्या जात आहेत. यामध्ये भाडेतत्त्वावरील एकच दरवाजा असलेल्या बस ठरावीक थांब्यांवर थेट वाहतूक करीत आहेत, मात्र या बसमध्ये अनेक वेळा सीट रिकाम्या असतानादेखील कंडक्टर नसल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढू दिले जात नाही. त्यामुळे क्षमता असतानादेखील प्रवासी कमी भरल्याने ‘बेस्ट’चे नुकसान होते, तर याच वेळी थांब्यांवर बसची वाट पाहणार्‍या प्रवाशांना समोरून रिकामी बस जात असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.  बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या गाड्यांना असलेल्या दोन दरवाजांमुळे वाहतूककोंडीतून चालक बस चालवत असताना अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करून निघून जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही मोहीम राबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून ‘बेस्ट’ उपक्रमाचे नुकसान टाळावे अशी मागणी शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी केली.

या उपक्रमात काही ठिकाणी कर्मचार्‍यांना कामच शिल्लक राहत नसल्याने मुंबई सेंट्रल, कुलाबा डेपोसारख्या ठिकाणी त्यांना ‘ग्राऊंड बुकिंग’ करण्याचे काम सोपवले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले, तर या उपक्रमात होणारे नुकसान टाळायचे असेल तर फक्त भाडेतत्त्वावरील बसमध्येच हा उपक्रम चालवावा किंवा ड्रायव्हरकडेच संपूर्ण नियंत्रण ठेवावे अशी मागणी भाजपचे सुनील गणाचार्य यांनी केली. श्रीकांत कवठणकर यांनीदेखील या उपक्रमात सुधारणा करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू झाल्यापासून संबंधित बसमार्गावरील ‘बेस्ट’ गाडय़ांच्या उत्पन्नाचा अहवाल सादर करावा असे निर्देश ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिले.

प्रशासन म्हणते, ‘संपर्क साधा, बस देऊ!’

विनावाहक बस उपक्रमात जाणार्‍या अनेक गाडय़ांमध्ये जागा उपलब्ध असताना या थांब्यावर थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना मुंबईकरांनी ‘बेस्ट’ला मेल आयडी आणि ट्विटरवर संपर्क करावा, प्रवाशांना आवश्यक असणार्‍या ठिकाणी बसमार्ग सुरू करू असे आश्वासन महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले. यासाठी [email protected] किंवा ‘बेस्ट’च्या ट्विटर अकाऊंटवर संपर्क साधावा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.