हिंदुस्थानी खासदारांचे विमान उतरण्यापूर्वी मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला!

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पर्दाफाश करण्यासाठी रशियाला हिंदुस्थानी खासदारांचे शिष्टमंडळ पोहोचले. हिंदुस्थानी शिष्टमंडळाच्या विमानाला राजधानी मॉस्कोवरून प्रदक्षिणा घालावी लागली. द्रमुक खासदार कनिमोई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये दाखल होताच, युक्रेनने ड्रोन हल्ला केला. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे, मॉस्कोमधील सर्व विमानतळांवर विमानांची वाहतूक बंद करण्यात आली होती. उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे हिंदुस्थानी प्रतिनिधी मंडळाचे विमान काही मिनिटे हवेतच होते. अखेर हिरवा सिग्नल मिळाल्यावर विमान मॉस्कोमध्ये उतरवण्यात आले.

विमान मॉस्कोमध्ये प्रवेश करताच युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. ड्रोन हल्ल्यामुळे, लँडिंग तात्काळ थांबवण्यात आले. यामुळे हिंदुस्थानी खासदारांचे विमान काही मिनिटे हवेतच होते. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी हे खासदार रशियाला पोहोचले आहेत. विमान उतरल्यानंतर, सर्व खासदारांचे मॉस्कोमधील हिंदुस्थानी राजदूत विनय कुमार यांनी स्वागत केले. सर्व खासदारांचे काम रशियन सरकार, वरिष्ठ खासदार, अधिकारी आणि तज्ञांना पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती देणे आहे. यासंदर्भात बोलताना खासदार कनिमोई म्हणतात की, हिंदुस्थानचे रशियाशी आधीच उत्कृष्ट संबंध आहेत. पाकिस्तानचे दहशतवादी जगासाठी कसे धोका बनत आहेत हे आम्ही रशियाला सांगणार आहोत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटले आहे की, दुसऱ्या देशातील सरकारी शिष्टमंडळ रशियाला भेट देऊ इच्छिते तेव्हा युक्रेन मॉस्कोवर ड्रोन हल्ला करतो. पुतिन यांच्या मते, युक्रेन हे जाणूनबुजून करत आहे जेणेकरून रशिया जगापासून तुटून जाईल. या भीतीमुळे लोकांनी रशियात येणे थांबवावे.

मॉस्कोमध्ये हिंदुस्थानी खासदारांच्या शिष्टमंडळाच्या प्रवेशादरम्यान झालेल्या, ड्रोन हल्ल्याबाबत युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. द कीव इंडिपेंडेंटच्या मते, युक्रेनकडून ड्रोन हल्ल्यांच्या भीतीने रशियाने 3 विमानतळ बंद केले आहेत.