ड्रोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित घोडेकर, [email protected]

काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान सरकारने लवकरच ड्रोनचा वापर करून मर्यादित सेवा देण्याला मान्यता दिली. यापुढे हिंदुस्थानात ड्रोन वापराच्या नवीन युगाला मोठय़ा प्रमाणात सुरुवात होईल ही अपेक्षा करता येईल.

काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान सरकारने लवकरच ड्रोनचा वापर करून मर्यादित सेवा देण्याला मान्यता दिली. खरं तर आजच्या घडीला ड्रोन वापराचे कोणतेही निकष नाहीत. त्यामुळे नवीन आलेल्या नियमावलीमुळे यापुढे हिंदुस्थानात ड्रोन वापराच्या नवीन युगाला मोठय़ा प्रमाणात सुरुवात होईल ही अपेक्षा करता येईल.

आपण काही वर्षांपूर्वी आमीर खानच्या ‘थ्री इडियट’मध्ये ड्रोन कॅमेरा बघितला होता. हा ड्रोन कॅमेरा म्हणजे हाताने रिमोट कंट्रोलचा वापर करून उडवायच्या या ड्रोनमध्ये एक कॅमेरा बसवण्यात आला होता, ज्याचा वापर करून फोटो किंवा व्हिडीओ काढता येत होते. आपल्या सगळ्यांची खरी ड्रोन भेट ही अशी झाली. गेल्या काही वर्षांत ड्रोन फोटोग्राफीचा वापर अनेक ठिकाणी केला जात होता. अनेक लग्न समारंभ तसेच अनेकदा बाहेरील शूटिंगसाठीही ड्रोनचा अनधिकृत वापर केला जात होता. त्यामुळे ड्रोन नावाचं हे नवीन प्रकरण बरंच चर्चेत आले होते.

पाश्चात्त्य जगात ड्रोनचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. खरं तर ड्रोन म्हणजे एक प्रकारचा उडता रोबोटच म्हणता येईल. या उडत्या रोबोटचा वापर अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. अगदी आपल्याकडे असणाऱया अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी ड्रोनचा वापर करून अवकाशात गस्त घातली जाऊ शकते किंवा मग हवाईमार्गे कोणत्याही वस्तूची देवाणघेवाण केली जाऊ शकते. परदेशात अनेक शेतकरी बांधव ड्रोनचा वापर करून शेतातील पिकावर नजर ठेवतात आणि गरज पडली तर प्रतिबंधात्मक उपायदेखील ड्रोनचा वापर करून करतात. अशा ड्रोनच्या वापराच्या एक ना अनेक रंजक गोष्टी आपण ऐकल्या असतील. आता या सगळ्या रंजक कहाण्या सत्यात उतरू शकतील.

आपल्याकडे पाश्चात्त्य देशांप्रमाणे ड्रोनचा वापर करण्याचा मार्ग यानिमित्ताने आता मोकळा झाला आहे. आता आपल्याकडेदेखील कदाचित भविष्यात ड्रोनचा वापर करून पिझ्झाची डिलिव्हरी सहज होऊ शकेल किंवा कदाचित आपला किराणा दुकानदार ड्रोनच्या साह्याने आपले किराणा सामान थेट आपल्या घरच्या खिडकीतून आपल्याला पोहोचते करील. अशा अनेक मजेशीर गोष्टी ड्रोनमुळे सहज शक्य होणार आहेत. सध्या ड्रोन वापरासाठी काही नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमाप्रमाणे सर्व ड्रोनची पाच वेगवेगळ्या प्रकारात विभागणी केली आहे. यात मुख्यत्वे छोटे ड्रोन ते मोठे ड्रोन अशा प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे आणि प्रत्येक वर्गवारीसाठी वेगळे नियम आहेत.

ड्रोन वापरण्यासाठी परवाना घ्यावा लागेल. त्यासाठी वयाचीदेखील अट घालण्यात आली आहे. अतिशय मोठय़ा प्रकारचा ड्रोन वापरण्यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागेल व त्यासाठी वेगळ्या अटी पूर्ण कराव्या लागतील. यामध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. पुढच्या काही वर्षांत आपल्या आयुष्यात ड्रोनरूपी एक नवीन तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होईल ते लवकरच कळेल, पण सध्या तरी ‘थ्री इडियट’मध्ये दाखवलेले ड्रोनचे एक स्वप्न पूर्ण होतंय हे नक्की.