उत्तर नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे उैर्फ भंडारदरा धरणावर सलग दुसऱ्या दिवशीही काही ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले आहेत. सदर ड्रोनमुळे धरणाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भंडारदरा धरण 100 टक्के भरलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणावर रात्रीच्या सुमारास दहा ते अकरा ड्रोन घिरटय़ा घालताना दिसत आहेत. सदर ड्रोन हे पाबरगडाच्या दिशेने येत असून, ते भंडारदरा धरण, कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी, घाटघर, अलंग-कुलंग-मलंग किल्ले, कळसूबाई पर्वतरांग, वाकी व परत पाबरगडाच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत. दोन दिवसांपासून दिसत असलेल्या या ड्रोनमुळे वन विभाग व पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपाल शंकर लाडे व कर्मचाऱयांनी भंडारदरा धरणाच्या भिंतीवर ड्रोन उडताना दिसत असल्याचे बघितले. ड्रोनसंदर्भातील माहिती पोलीस विभागाकडून वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. ड्रोनबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. भंडारदरा धरण आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. यामुळे धरणाला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. आता धरणावर ड्रोन उडताना बघितल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सदर ड्रोन नेमक्या कोणत्या कारणास्तव उडत आहे, याची माहिती प्रशासनालाही उपलब्ध होऊ शकली नाही. या ड्रोनद्वारे काही शासनाचा सर्वे चालू आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
धरण विभागाकडून सतर्कता नाही
हवेत उडत असलेल्या ड्रोनमुळे पोलीस विभाग व वन विभागाने जितकी सतर्कता दाखवली तितकी सतर्कता भंडारदरा धरण शाखेकडून मात्र दाखविली गेली नाही. धरणाची सुरक्षिता ही महत्त्वाची असून, भंडारदरा धरणावर उडत असलेले ड्रोन हे नक्की कुणाचे आहेत? आपत्ती व्यवस्थापनाकडे याची काही माहिती उपलब्ध आहे का? महसूल विभागाकडून सदरची माहिती वरिष्ठांना कळविली गेली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.