
सामना प्रतिनिधी । पारोळा
पारोळा तालुक्यात मागील तीन वर्षापासून दुष्काळ सुरु असून यावर्षी तर खायची पडली आहे, पिण्यास पाणी नाही, गुरांना चारा नाही, त्यांना विकण्याची स्थिती आली आहे. निसर्गाने आम्हाला मारले आहे. आता तुम्ही तरी आम्हाला मदत करा अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळी पाहणी पथकास दिली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात आले आहे. आज पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथे या पथकाने पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकाजवळ मांडल्या. यावेळी केंद्र सरकारच्या सहसचिव छवी झा, सीडब्ल्यूसी संचालक आर.डी.देशपांडे, ए.के.तिवारी, शालिनी सक्सेना, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आदी उपस्थित होते. गट क्रमांक ४३ मधील बाळू नथा पाटील, ४४/२ मधील नारायण् श्रीराम पाटील , ४१/१ मधील दगडू पाटील, भीमराव पाटील, लटकन पाटील, कळू पाटील व सरपंच संगीता पाटील यांच्याशी चर्चा या पथकाने केली.
शेतकऱ्यांनी सांगितले कि, सन २०१३ पासून या भागात पावसाचे अल्प प्रमाण आहे. या वर्षी तर मोजून दोन पाऊस झाल्याने आज या परीसरातील विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गुरांना पाणी, चारा नसल्याने निम्मे किमतीत गुरे विकावी लागत आहे. मजूर वर्गाच्या हाताला काम नाही. १९७२ पेक्षा मोठा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीमुळे व अल्प पावसामुळे रब्बीची पिके घेता येत नसल्याची खंत व्यक्त केली. यामुळे आम्हाला ठोस मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
पथकांनी दिल्या सूचना
शेतकऱ्यांच्या व्यथा एकूण व प्रत्यक्ष शेती बघून केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांना सदर गावात मनरेगाची कामे सुरु करा. मागणी प्रमाणे टँकरने पाणी पुरवठा करा, पंतप्रधानकृषी सिंचन योजनेतून सिंचनाची कामे करा, केंद्राच्या पोखरा योजनेचा लाभ द्या अशा अनेक सूचना दिल्यात.





























































