
सामना प्रतिनिधी, हिंगोली
पोटच्या लेकराप्रमाणे लहानाच्या मोठ्या केलेल्या संत्रा, मोसंबी, पेरुच्या फळबागा यावर्षीच्या भीषण दुष्काळात पाण्याअभावी वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने डबडबले आहेत. कधी काळी भुईमुग, केळी, संत्रा, मोसंबीच्या बागांमुळे हिरवागार असलेला हिंगोली जिल्ह्यातील शेतशिवार यावर्षी मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे ओसाड पडला असून पीक व फळबागाचं सोडा आता शेतकऱ्यांना स्वत:च्या व जीवापाड जपलेल्या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी दररोज जीवघेणी धडपडत करावी लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. नापिकी व दुष्काळामुळे अर्थचक्र कोलमडलेल्या बळीराजासमोर गायी-गुरे व फळबांगा जगविण्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारपण, मुला-बाळांचे शिक्षण व मुलींचे विवाह कसे करायचे ? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन-चार वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले असून शेकडो शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्येचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाच्या वाट्याला या दुष्काळामुळे वनवास आला असून शेतातील नापिकी व हाताला काम मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, हिंगोली व सेनगाव या तालुक्यात एकेकाळी विहीरी, बोअरवेल, तलाव या जलस्रोतांसह धरणातून मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याने शेतकरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भुईमुग, टरबुजासह भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत. भुईमुगासह इतर पिकांमुळे भर उन्हाळ्यातही शेतशिवार हिरवागार दिसून येत असे.
यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी, पेरु, केळीच्या फळबागांची देखील लागवड केल्याने फळबागा हा शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा मुख्य स्रोत बनल्या होत्या. खरीप व रब्बी हंगामातील पीके व फळबागातुन उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळत असल्याने शेतकरी सुख-समाधानात होता. शेतकऱ्यांनी नागपुर, अमरावती जिल्ह्यातुन आणलेली संत्रा, मोसंबी, लिंबु, पेरुची रोपटी लागवड करुन पोटच्या लेकराप्रमाणे ह्या फळबागा लहानाच्या मोठ्या केल्या होत्या. मात्र, मागील तीन-चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ जिल्ह्यात कायम आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ असल्याने विहीरी, बोअरवेल, तलाव कोरडेठाक पडले असून जिल्ह्यातील ईसापुर, सिध्देश्वर व येलदरी या तीनही धरणांनी तळ गाठला आहे. परिणामी, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे हजारो एकरवरील फळबागांचे वाळून सरपण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी घरातील खरीप व रब्बी हंगामात झालेले उत्पन्नही फळबागा वाचविण्यासाठी बोअरवेल, विहीरी घेण्यात घातले. मात्र, बोअरवेल व विहीरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्यांचा पैसाही गेला अन् फळबागाही वाळल्याने शेतकऱ्यांचे डोळे अश्रुंनी डबडबल्याचे दिसून येत आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात तीव्र चारा व पाणी टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांना आता जीवापाड सांभाळलेली गायी-गुरे देखील जगविणे कठीण होऊन बसले आहे.
चारा व पाण्याअभावी शेतकऱ्यांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलेली जनावरे आता जड अंत:करणाने बाजारात विक्रीसाठी आणीवी लागत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन खरेदीसाठी कुणीही पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांची लाखमोलाची जनावरे आता कवडीमोल भावात विक्री करावी लागत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यावर्षीच्या दुष्काळाने अनेक शेतकऱ्यांच्या गायी-गुरांनी भरलेल्या गोठ्यातील दावणी मोकळ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लग्नाला आलेल्या मुलींचे विवाह थांबले आहेत. कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालेल्या शेतकऱ्यांना मुलीचा विवाह कसा करायचा ? अशी चिंता छळत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीला झोप येत नाही. भिषण दुष्काळी परिस्थितीमुळे नापीकी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत असुन कुटुंबाचा उदरनिर्वाह, गायी-गुरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न, आजारपण, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा अनेक चिंता बळीराजाच्या जीवाला रोजच जाळत आहेत.





























































