शिवसेनेच्या मोर्चामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित व्हावा म्हणून शिवसेनेने गेल्या महिन्याभरात ठिकठिकाणी निवेदने दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या 15 ऑक्टोबरच्या बुलढाणा बैठकीस शिवसेना खासदार, आमदारांनी संपूर्ण जिल्ह्याची दुष्काळाची परिस्थिती कथन करुन, निवेदने दिले. एवढ्यावरच शिवसेना थांबली नाही तर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा म्हणून विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन शासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्याचा परिपाक म्हणून अखेर संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांना दिले.

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकर्‍यांना गावातील लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांना आवाहन केले होते की, पिक आणेवारी काढताना सतर्क राहावे. त्यानंतर गावागावातील शिवसेना, शाखाप्रमुख पदाधिकार्‍यांनी सतर्क राहून पिक आणेवारी काढून घेतली. संपूर्ण जिल्ह्याची पिक आणेवारी 45 पैशाच्या आत आले असताना देखील दुष्काळ घोषित करताना बुलढाणा जिल्ह्यातील 90 महसूल मंडळांपैकी 73 महसूल मंडळे हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती. उर्वरित 17 महसूल मंडळांवर हा अन्याय होता म्हणून ज्या तालुक्यातील गावे वगळण्यात आली त्या ठिकाणच्या शिवसेना तालुकाप्रमुख व इतर पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना निवेदन देवून संपूर्ण परिस्थिती कथन केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ऑक्टोबरला बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आले असता शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार द्वय डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच निवेदन देखिल दिले होते. तरी प्रशासन हलायला तयार नव्हते म्हणून अखेर शिवसेनेने 12 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मोर्चात संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही तर शिवसेना मोठे आंदोलन उभारेल, मंत्र्यांना गावबंदी करेल असा इशारा दिला होता. या मोर्चाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेवून अखेर संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे खरे श्रेय हे शिवसेनेलाच जाते असे जनता बोलून दाखवत आहे.