दुष्काळाचे दुष्टचक्र; दहा हजार हेक्टरवरील फळबागा सलाईनवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

शेती नुकसानीची हातात काही तरी फायदा पडेल या हेतूने फळबागा फुलवलेल्या शेतकऱ्याची झोप उडाली आहे. भीषण दुष्काळात सर्व काही मिळेल बागा जगवण्यासाठी पाणी कोठून आणावे, एकदा फळबागा उद्ध्वस्त झाल्यातर पुन्हा पदरात काय या चिंतेने बीड जिल्ह्यातील शेतकरी भयभीत झाला आहे ,बीड जिल्ह्यातील तब्बल दहा हजार हेक्टरवरील फळबागा दुष्काळामुळे सलाईनवर आहेत, उपाय सापडला नाही तर या बागा जळून खाक होणार, हे निश्चित झालं आहे.

बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळाच्या दुष्टचक्राने शेतकऱ्यांना कंगाल केले आहे, परंपरागत शेती तोट्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवत यशाचा मार्ग सापडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच फळबागांची शेती बाळसे धरू लागली. जिल्हाभरात तब्बल दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त भागात फळबागा फुलवण्यात आल्या. यात पपई, केळी, टरबूज, डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, जाम्ब, केशर आंबा, ड्रॅगन, मोसंबी, लिंब या फळांचा सामावेश आहे. कापूस, ऊस, तूर, बाजरी, ज्वारी या पारंपरिक आणि नगदी पिकापेक्षा फळबाग लागवडीवर भर दिला गेला. श्रम, पाणी आणि लागवड खर्च कमी उत्पादनाची जास्त हमी हा मंत्र लक्षात ठेवूनच शेतकरी कामाला लागला. मात्र या भीषण दुष्काळाने फुललेल्या फळबागा उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे.

एक तर वातावरणातील बदलामुळे पिकावर रोगराई वाढली आणि आता पाणीच नसल्यामुळे फळबागा कशा जगवाव्यात हा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला आहे. तलाव कोरडे पडले, शेततळे आटले, विहिरींनी तळ गाठला, टँकरने पाणी कोठून आणावे, सर्व काही मिळेल पण पाणी कोठून मिळणार आणि फळबागा कशा जपणार या चिंतेने शेतकरी भयभीत झाला आहे. यंदा फळबागा जगवल्या नाहीत तर होणारे नुकसान पुढचे पाच वर्षे भरून निघणार नाही. तळहातावर सांभाळलेल्या या बागा उद्ध्वस्त होतांना पाहत राहणे, हेच फक्त शेतकऱ्याच्या हाती राहिले आहे.

summary- drought situation at beed