
संतोष तागडे । आष्टी
आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीने भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या गाय, बैल, म्हैस या मुक्या जनावरांनादेखील पाणी आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत 1972 पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थीती तालुक्यात निर्माण झाली असून जनावरांसाठी असलेला शेतक-यांजवळील चारा संपुष्टात आला आहे.
यंदा झालेल्या कमी पावसामुळे माळरानावर सुध्दा चारा शिल्लक नाही, त्यामुळे जनावरे कशी जगवायची असा प्रश्न शेतक-यांसमोर पडला आहे. विकतचा चारा, खाऊ घालुन शेतकरी आपली जनावरे सांभाळत आहे. दुष्काळ असो वा नसो, शेतकऱ्यानी आजपर्यंत पोटचं लेकरू आणि गोठ्यातील जनावर यात कधी फरक केला नाही. पोटची पोरं पाण्यासाठी दिवसभर वणवण करताय, तर दावणीला बांधलेली लेकरांइतकीच जिव्हाळ्याची असलेली जनावरे चारा पाण्यासाठी हंबरडा फोडतायेत या मुक्या जनावरांना कुठून चारा आणायचे, या चिंतेने जीव कासावीस होतोय. दिवसभर इकडून-तिकडून दोन-चार हंडे पाणी मिळतेत , पण जनावरांचे खपाटीला गेलेले पोट पाहवत नाही. त्यांना चारा आणायचा कुठून.. मायबाप सरकारने जर या जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था केली तर खूप बरं होईल…, असा कळकळीचा सवाल तालुक्यातील शेतकऱ्यातून होत आहे.

































































