गणपतीपुळ्यात बुडणाऱ्या मुंबईच्या तरुणाला वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई येथून गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आलेला एक तरुण शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास गणपतीपुळ्यात पोहण्यासाठी गेलेला असताना बुडाला. समुद्राच्या लाटांबरोबर तो तरुण गटांगळ्या खात असताना जीवरक्षकांनी त्याला वाचवले.

विक्रोळीहून तिघेजण शुक्रवारी दुपारी गणपतीपुळ्यात आले. त्या तिघांपैकी चंद्रकांत भागवत दामोदरे (32) रा. सुर्यनगर विक्रोळी हा एकटाच पोहण्यासाठी समुद्रात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. आपण बुडत आहोत याची जाणीव होताच चंद्रकांतने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षक रोहित चव्हाण अनिकेत मयेकर, उमेश म्हादये, ओंकार गावणकर, विशाल निंबरे, अनिकेत चव्हाण व प्रमोद डोर्लेकर यांनी पाण्यात उड्या मारून चंद्रकांतला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेबाबत वारंवार सूचना देण्यात येत आहेत. जीवरक्षकांमुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचत आहेत.