
महाड औद्योगिक वसाहतीत अमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महाड एम. आय.डी.सी पोलीस, रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथक यांनी संयुक्तपणे केली आहे. या कारवाई दरम्यान 88 कोटी 92 लाख रुपये किंमतीचा ‘किटामाईन’ हा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई महाड औद्योगिक वसाहती मधील प्लॉट नं. इ 26/3 येथे करण्यात आली. या ठिकाणी रोहन केमिकल्स नावाची कंपनी कार्यरत होती. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ बनवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली.
कारवाईदरम्यान किटामाईन नावाचा नशेचा आणि वैद्यकीयदृष्ट्या नियंत्रित अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेला आढळून आला. हा पदार्थ विनापरवाना तयार केला जात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी चार जणांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मच्छिंद्र भोसले, रा. जिते, ता. महाड, सुशांत संतोष पाटील, रा. मोहप्रे, ता. महाड, शुभम सुतार, रा. कोल्हापूर, रोहन गवस, रा. मालाड, मुंबई असे या आरोपींची नावे आहेत.
महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत असून, या प्रकरणात अजून कोणी गुन्ह्यात सहभागी आहे का, तसेच या पदार्थांची विक्री कोणत्या मार्गाने केली जात होती याचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध अमली पदार्थांच्या साठ्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहीमेतील एक मोठी कारवाई मानली जात असून, या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एन.डी.पी.एस. अधिनियम सन 1985 चे कलम 8(c), 22(c),25,27(a), 29,42 बी.एन.एस. 2023 चे कलम 3(5) अन्वये अपराध केला आहे म्हणून त्यांचेविरुध्द सरकारतर्फे तक्रार दाखल आहे. सदर कामगिरी बाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे सो यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे