
सामना ऑनलाईन । चंदिगड
दहा वर्षांपुर्वीचा बदला घेण्यासाठी एका केमीस्टने औषध परवाना अधिकारी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तसेच हत्या करून हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ. नेहा शौरी असे हत्या झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. पंजाबमधील खरड येथे शुक्रवारी भरदिवसा ही धक्कादायक घटना घडली.
पंजाबमधील खरड येथील विभागीय औषध परवाना अधिकारी असलेल्या नेहा शौरी यांची दिवसाढवळ्या कार्यालयात घुसून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेहा यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरेपीची ओळख पटली असून बलविंदर सिंह असे त्याचे नाव आहे. बलविंदर याने सूडबुद्धीने हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवीला आहे. 2009 साली बलविंदर सिंह याच्या औषधांच्या दुकानावर नेहा यांनी छापा टाकला होता. या छाप्यात नशेची औषधे आढळल्याने त्याचा परवाना रद्द केला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्या झाली त्यावेळी नेहा या त्यांच्या 3 वर्षाच्या भाचीसोबत बोलत होत्या. आरोपीने नेहा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करून बलविंदर पळून जात असताना नागरिकांनी त्याला घेरले. त्यावेळी त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत स्वत:ला संपवले.

























































