
सामना प्रतिनिधी, मुंबई
गणेशोत्सवात पोलिसांचा शहरात तगडा बंदोबस्त असतो. गल्लीपासून चेकनाक्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जाते. याचाच नेमका ड्रग्ज तस्करांनी धसका घेतला आहे. त्या 11 दिवसांत ड्रग्जची सप्लाय करणे अवघड होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दहा दिवस आधीच शक्य तितक्या जास्त प्रमाणात शहरात ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी रेकॉर्डवरचे तस्करच रस्त्यावर उतरले आहेत.
गेल्या काही दिवसांत अमली पदार्थविरोधी कक्ष तसेच अंबोली, डोंगरी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी धडक कारवाया करत रेकॉर्डवरील बडय़ा ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या तस्करांकडून जवळपास 50 लाखांचा कोकेन, एमडी, एमडीएमए, गांजाचा साठा जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवस आधीच शहरातील पेडलर्सपर्यंत मोठय़ा प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करण्यावर आम्ही भर दिला आहे.
गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ड्रग्जची सप्लाय करता येत नाही. त्या 11 दिवसांमध्ये मोठय़ा संख्येने लोक घराबाहेर पडतात. तरुण-तरुणी रात्रीचेही बाहेर असतात. नशा करणाऱयांकडून तेव्हा गांजा, एमडी, कोकेनची मागणी होते. त्यामुळे आम्ही आधीच सगळी तयारी करत असून शहरातील प्रत्येक स्पॉटला ड्रग्ज उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या त्या सराईत ड्रग्ज सप्लायर्सनी चौकशीत म्हटल्याचे ‘एएनसी’च्या अधिकाऱयांनी सांगितले.
हे गेलेत गजाआड
कासिम मोहम्मद सिद्धिकी (250 ग्रॅम एमडी, 5 लाख), अदिल नाकवा (100 ग्रॅम एमडी, 4 लाख), सलीम खान (14 ग्रॅम एमडीएमए, 1 लाख), असिफ इक्बाल खान (58 ग्रॅम एमडी), लता चौरे (10 किलो गांजा), राणी बरसाय्या (5 किलो गांजा), फेमी ओपयेमी (472 ग्रॅम कोकेन, 37 लाख 76 हजार) यांच्यासह अन्य ड्रग्ज सप्लायर्स गेल्या आठवडाभरात गजाआड गेले आहेत.
जितका शक्य होईल तितक्या मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ पेडलर्सपर्यंत पोहचविण्यास सप्लायर्सनी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रेकॉर्डवरचे बडे ड्रग्ज सप्लायर्स स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. आमची सर्वत्र नजर असून ड्रग्जवाल्यांचे साफ कंबरडे मोडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. दररोज कुठे ना कुठे तस्कर हाती लागत असून लाखो रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला जात आहे.
-शिवदीप लांडे, उपायुक्त (अमली पदाथविरोधी कक्ष)
summary- drug peddlers are in action before ganesh festival

























































