
सामना प्रतिनिधी । ठाणे
साहेब तुमच्या दुकानाचे वाढीव बांधकाम आहे, पाकीट पाठवून द्या…नाहीतर पालिकेत तक्रार करतो, अशा धमक्या देत हॉटेल व्यावसायिक असो वा बिल्डरांना ब्लॅकमेल करून लुटपाट करणाऱ्या खंडणीखोरांचा ठाण्यात सुळसुळाट झाला आहे. भाई, आज पार्टी है, चॉकलेट चाहिए, अशा ’कोडवर्ड’चा वापर करून विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवठा करणाऱ्या नशेच्या सौदागरांनी शहरात पाळेमुळे घट्ट केली आहेत. गेल्या वर्षभराचा ठाण्याचा क्राईम रिपोर्ट अमली पदार्थ आणि खंडणीच्या गुन्हय़ांनीच फुल्ल झाला आहे.
मुंबई लगत झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहरात बड्या बिल्डर्स, व्यावसायिक, शेअर ब्रोकर्सने बस्तान बसवले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी येथे विशेष लक्ष देण्यास सुरुवात करताच आपसूकच येथील गुन्हेगारी कारवाया झपाटय़ाने वाढल्या आहेत. यामध्ये गुंडांच्या साथीने ’व्हाईट कॉलर’ ब्लॅकमेलरचा सुळसुळाट वाढला असून 2018 मध्ये तब्बल 39 खंडणीखोरांना खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या टीमने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 11 लाखांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे. तर वर्षभरात विविध प्रकरणांतील 105 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून दोन कोटी 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमलीपदार्थांची तस्करी सुसाट…
कोट्यवधींच्या एफेड्रीनवरील कारवाईनंतर ठाण्यातील अमलीपदार्थांच्या तस्करीचे रॅकेट देशभरात गाजले. या वर्षअखेरपर्यंत अमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने तीन कोटी 32 लाखांचे ड्रग्स जप्त केले असून 179 तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर खंडणीविरोधी पथकानेही एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हे नोंदवत पाच प्रकरणांतील 14 ड्रग पॅडलर्सकडून एक कोटी 61 लाख रुपयांचे ड्रग्स हस्तगत केले आहे.
अवैध शस्त्रांचा बाजार
विनापरवाना पिस्तूल येथील गुन्हेगारांकडे सापडल्याच्या तक्रारी दिवसागणिक वाढत असतानाच खंडणीविरोधी पथकाने वर्षभरात एक एके 56 रायफल, तीन मॅगझीन्स, 48 काडतुसे, 14 पिस्तूल, 95 जिवंत काडतुसे व प्रत्येकी एक तलवार, देशी कट्टा, रिव्हॉल्व्हर आदी शस्त्र्ाास्त्र्ाs चार प्रकरणांतील सात जणांकडून जप्त केली आहेत.
अमलीपदार्थांची कोटीच्या कोटी उड्डाणे (वर्षभरात जप्त केलेले)
सुडो एफेड्रीन : 1 कोटी 45 लाख
गांजा : 84 लाख सात हजार
चरस : 69 लाख 55 हजार
एफेड्रीन : 20 लाख
ट्रमाडॉल : 12 लाख 74 हजार
ठाण्यातील व्यावसायिकांवर घोंगावणारी ’अंडरवर्ल्ड’च्या धमक्यांची पाळेमुळे वर्षभरात खणून काढली असून आरटीआय कार्यकर्त्यांविरोधातील फास घट्ट झाला आहे. भविष्यात तेही संपवून टाकणार असून ब्लॅकमेलरवर कारवाई सुरूच राहणार आहे. – प्रदीप शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणीविरोधी पथक.





























































