एनसीबीच्या चौकशीला अनन्या पांडे गैरहजर, जाणून घ्या काय आहे कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची ड्रग्ज चॅट प्रकरणी आतापर्यंत दोनदा चौकशी केली आहे. सोमवारी (25 ऑक्टोबर) अनन्या तिसऱ्यांदा एनसीबीसमोर हजर होणार होती, मात्र आता वैयक्तिक कारणांचा हवाला देत तिने आज चौकशीला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले आहे.

क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खान हा सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सऍप चॅटस् एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्या चॅटस्नंतर एनसीबीने अनन्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. गेल्या दोन दिवसांत एनसीबीने तिची सहा तास चौकशी केली आहे. एनसीबीने अनन्याला शुक्रवारी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ती दुपारी 2 वाजता वडील चंकी पांडेसोबत आली होती. तेव्हा एनसीबीचे अधिकारी अनन्यावर चिडले. हे एनसीबीचे कार्यालय असून तुझे प्रोडक्शन हाऊस नसल्याचे खडेबोल एनसीबीच्या अधिकाऱ्याने अनन्याला सुनावले.

चौकशीदरम्यान एनसीबीने अनन्याला ड्रग्ज पेडलरबाबत प्रश्न विचारले असता तिने त्याबाबत आपणास माहिती नसल्याचे सांगितले. आपण कधीच ड्रग्ज घेत नसल्याचे सांगत अनन्याने ड्रग्जबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच व्हॉट्सऍपवर आपण ड्रग्जबाबत कधीही बोलली नसल्याचे तिने एनसीबीला सांगितले. चौकशीदरम्यान एनसीबीने तिला आर्यनची मैत्री आणि ड्रग्जबाबत प्रश्न विचारले होते. अनन्याने दिलेल्या माहितीवर एनसीबी समाधानी नसल्याने तिची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी तिला रविवारी एनसीबीने समन्स पाठवून सोमवारी सकाळी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ती या चौकशीला आज गैरहजर राहिली आहे.