गावकऱ्यांना संशय आला, त्यांनी घेराव घातला आणि खेळ खल्लास झाला; कर्जतमध्ये ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे दहा बाय बाराच्या घरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीवर गावकऱ्यांनीच छापा घातला. अंधारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे कळताच गावकरी घटनास्थळी धावत आले. त्यांनी या फॅक्टरीला घेराव घातला आणि ड्रग्जमाफियांचा खेळ खल्लास झाला. पोलिसांनी ड्रग्ज बनवणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने डी फार्मसीची डिग्री घेतली असून हे सर्व तरुण मुंबईतील आहेत.

पाथ्रज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी ही आदिवासी वाडी आहे. या गावात निर्जनस्थळी लक्ष्मण फसाळ या आदिवासीने 10 बाय 12 फुटांचे घर उभारले आहे. हे घर मुंबईतील काही लोकांनी भाड्याने घेतले असून ती गेले वर्षभर येथे राहात आहेत. रविवारी रात्री या घरात काही संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्या घराजवळ मारुती ब्रिझा कार उभी करण्यात आली. तसेच एक रुग्णवाहिकाही घरापासून पाचशे मीटर अंतरावर आणण्यात आली. काही तरुण त्या घरातून डोक्यावरून काही खोके घेऊन रुग्णवाहिकेत ठेवत होते. हे पाहून गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी गावात वर्दी देत घटनास्थळी धाव घेतली आणि या घराला घेराव घातला.

मुंबईतील पाच जणांवर झडप

घरात पाच तरुण ड्रग्ज बनवताना आढळले. मोठ्या चंबूंमध्ये निळे, पिवळे आणि सफेद रंगाचे रसायन ठेवून त्यांना इलेक्ट्रिकच्या माध्यमातून उकळवले जात होते. गावकऱ्यांनी नेरळ पोलीस हद्दीतील कळंब पोलिसांना याची माहिती देताच पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हे ड्रग्ज बनवणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले. दोन महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकून २२ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.

रुग्णवाहिकेसह चालक फरार

ताब्यात घेतलेल्या या पाच तरुणांमध्ये एकाने डी फार्मसीची डिग्री घेतली आहे. तो धारावी येथे राहतो तर उर्वरित तरुण हे मुंबईच्या विविध भागांत राहात असल्याचे स्पष्ट झाले. गावकऱ्यांना पाहताच चालक रुग्णवाहिकेसह फरार झाला. अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे करत आहेत.

गावकऱ्यांना पाहताच तोडफोड

घरात घुसलेल्या गावकऱ्यांना आणि पोलिसांना पाहताच या तरुणांनी रसायने जमिनीवर ओतायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःचे मोबाईलही फोडले. पोलिसांनी ही रसायने आणि काही मोबाईल ताब्यात घेतले. घटनास्थळी बर्फाच्या लाद्या आणि कागदी खोके सापडले. हे सर्व रसायने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.