
राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीचा चढता आलेख आहे. पोलिसांनी मुंबईतील गँगवाँर संपवले, तर मग ड्रग्जविक्रीचे रॅकेट का संपवू शकत नाही, असा सवाल शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केला. त्यावरील उत्तरात, राज्यात मागील वर्षात तब्बल 4 हजार 240 कोटी 90 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली.
मालाडमधील ड्रग्जविक्रीच्या संदर्भात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत भाग घेताना दिंडोशी विधानसभेतील ड्रग्ज विक्रीकडे शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, मागील सहा महिन्यांत एकही कारवाई झालेली नाही. कोणत्याही गार्डनच्या बाहेर जा, ड्रग्ज, एमडी मिळते. रिक्षात विकले जाते. ड्रग्जविक्रीला नियंत्रणातच आणू शकत नाही. आमच्या विभागातील सर्व पातळ्यांवरील पोलीस अधिकाऱ्यांकडे माझा यासंदर्भात पाठपुरावा सुरू असतो. रात्री पानाच्या टपऱ्यांवर अमली पदार्थ विकले जातात. पोलिसांना हे माहीत नाही का? मुंबईतील गुन्हेगारी पोलिसांनी ज्याप्रकारे बंद केली त्याप्रमाणे अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करू शकत नाही का ? एका रात्री एकाने अमली पदार्थांच्या नशेत एकावर वार केले. विक्रीवर प्रतिबंध कसा करणार, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.
या चर्चेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत ड्रग्ज रॅकेटमध्ये एखादा पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्याला तत्काळ पदावरून बडतर्फ करण्यात येईल. तसेच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. 2024 मध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 15 हजार 873 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. 14 हजार 230 लोकांना अटक करण्यात आली.





























































