दारूच्या नशेत घातला विमानात गोंधळ, प्रवाशाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोहा ते बंगळुरू विमान प्रवासात गोंधळ घालून दम मारो दम करणाऱया प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शरफुद्दीन अलवर असे त्याचे नाव आहे. त्याच्यामुळे बंगळुरूला जाणारे विमान वैमानिकाला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. मोहम्मदला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मूळचा केरळचा रहिवासी असलेला मोहम्मद दोहा येथून शनिवारी प्रवास करत होता. विमान बंगळुरूला येत असतानाच मोहम्मदचा विमानात बसण्याच्या जागेवरून वाद झाला. तेव्हा केबिन क्रूनेदेखील त्याची समजूत घातली. मात्र दारूच्या नशेत असलेल्या मोहम्मदने विमानात गोंधळ घालणे सुरूच ठेवले. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या मोहम्मदने विमानाताच सिगारेट पिऊ लागला. हा प्रकार केबिन क्रूच्या लक्षात आल्यावर तिने याची माहिती वैमानिकाला दिली. वैमानिकानेदेखील सूचना केल्यानंतरही मोहम्मद हा सिगारेटचे झुरके मारत होता.

प्रवाशासह तो केबिन क्रूशीदेखील तो वाद घालत होता. सिगारेटमुळे अनुचित घटना घडू नये म्हणून वैमानिकाने विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग केले. वैमानिकाने याची माहिती विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱयाला दिली. काहीच वेळातच सुरक्षा अधिकारी विमानात आले. मोहम्मदला खाली उतरवल्यानंतर विमान पुन्हा बंगळुरूच्या दिशेला गेले. विमानात दम मारो दम आणि प्रवाशाशी वाद घातल्याप्रकरणी मोहम्मदला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी मोहम्मदविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. मोहम्मदचा विमानात सिगारेट ओढण्याचा नेमका हेतू काय होता, इमर्जन्सी लँडिंगसाठी त्याने हे कृत्य केले होते का याचा तपास आता सहार पोलीस करत आहेत.