पोलिसांना मारहाण, शिविगाळ करणाऱया चार मद्यपींना अटक; कराड तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलिसांसह होमगार्डला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना ओगलेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कराड न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी चारही आरोपींना हमरस्त्यावरून चालवत न्यायालयापर्यंत नेले.

चैतन्य बाळासाहेब ओव्हाळ (वय 25), पंकज संजय डुबल (वय 25), रोहित शशिकांत चन्ने (वय 28), आफताब सिकंदर शेख (वय 22,  सर्व रा. मळावार्ड, ओगलेवाडी, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलीस हवालदार धीरज कोरडे व होमगार्ड पवार हे ओगलेवाडी, सैदापूर, विद्यानगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ओगलेवाडी हद्दीतील रेल्वे स्टेशन रस्त्याच्या डाव्या बाजूला पाईप कंपनीच्या बंद पडक्या घराबाहेर आरडाओरडा सुरू होता. यावेळी पोलीस हवालदार कोरडे व होमगार्ड पवार तेथे गेले असता संशयित चैतन्य ओव्हाळ, पंकज डुबल, रोहित चन्ने, आफताब शेख हे चौघेजण दारू पित असल्याचे दिसून आले.

यावेळी कोरडे यांनी आम्ही पोलीस आहोत, तुम्ही आरडाओरडा करू नका. त्यामुळे शेजारी राहणाऱया लोकांना त्रास होत आहे, असे सांगितले. मात्र,  पंकज व रोहित यांनी त्यांना धमकी देत मारहाण केली. यात कोरडे यांच्या हाताला मार लागला; तसेच आफताब शेख याने शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस हवालदार धीरज कोरडे यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे तपास करीत आहेत.