यवतमाळच्या वणीजवळ मद्यधुंद ट्रक चालकाची टोल नाक्याला धडक; ट्रकचालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विपुल खनिज संपत्ती आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या भागात अपघातांची शक्यताही जास्त असते. कोळसा वाहतुक करणारा भरधाव ट्रक मुख्य मार्ग सोडून टोल नाक्याला धडकल्याची घटना घडली आहे. या धडकेत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

घुग्गुसकडून कोळसा भरून येत असलेला भरधाव ट्रक रस्ता सोडून अचानक टोल नाक्याला धडकला. टोल काउंटरवर असलेला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत काउंटरबाहेर उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. नेहमी टोल नाक्याच्या दुभाजकावर पहारा देणारा सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी त्यावेळी तेथे नसल्याने मोठा अनर्थ टळला. मद्यधुंद ट्रक चालकाने वणीकडे जाणारा मार्ग सोडून विरुद्ध मार्गावरील दुभाजकावर ट्रक चढवत टोल नाक्याला जोरदार धडक दिली. या धडकेत टोल नाक्याची एक बाजू व टोल काउंटर पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी तात्काळ घटनास्थळी पोहचले. मद्यधुंद ट्रकचालकास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.