
येथील दूधगंगा–वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 2025–26 या गाळप हंगामासाठी प्रतिटन 3452 रुपयांप्रमाणे विनाकपात पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊसदर नाही, असेही त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘बिद्री’ने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून शेतकऱयांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हंगाम समाप्तीनंतर सरकारच्या नियमाप्रमाणे सरासरी साखर उताऱयानुसार शेतकऱयांना अंतिम ऊसदर दिला जाईल. कारखान्याने सर्व देणी वेळेवर भागवून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, सभासद यांचा विश्वास जपला आहे.
विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन 8 हजार 500 टन क्षमतेने ऊसगाळप करण्यास सज्ज आहे. कारखाना व्यवस्थापनाने ठरविलेले 10 लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस उत्पादकांनी ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
             
		



































 
     
    






















