
पालकमंत्री पद हे अतिशय महत्त्वाचे व घटनेने निर्माण केलेले आहे. पण रायगड जिल्ह्याला सध्या पालकमंत्रीच नसल्याने विकासात गॅप पडला असल्याची कबुली आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज अलिबागमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांचा विषय निघाला तेव्हा सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्री हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे पालकमंत्री नियोजन समिती तसेच अन्य समित्यांचे अध्यक्षदेखील असतात.
पण रायगडात हक्काचा पालकमंत्री नसल्यामुळे विकासाचा आराखडा, विविध प्रश्न मार्गी लावताना अडचणी येत आहेत. एकूणच विकासामध्ये काहीशी गॅप पडला असल्याचेही त्यांनी मान्य केले.
73 वी घटना दुरुस्ती होण्यापूर्वी राज्यातील जिल्ह्यांना संपर्कमंत्री होते. त्यानंतर त्याचे रूपांतर पालकमंत्र्यांमध्ये झाले. तसेच जिल्हा नियोजन समित्यादेखील अस्तित्वात आल्या. या समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह नगरपालिका व महानगरपालिका, जिल्हा परिषद याचे सदस्य असतात. या समितीचा अध्यक्ष हा पालकमंत्री असल्यामुळे त्या माध्यमातूनच जिल्ह्याचा विकास आराखडा तयार होतो. पण रायगड जिल्हा पालकमंत्रीविना असल्यामुळे विकासात गॅप पडला असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
गेल्या अनेक दिवसांपासून रायगडचे पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात तू तू मै मैदेखील होते. याबाबत तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच घेतली अशी अपेक्षा आहे. निधी वाटपाचे धोरणदेखील ठरले असून त्यानुसार त्याचे वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.