
2025 या वर्षात टेक इंडस्ट्रीत मोठी उलथापालथ झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कार्यक्षमतेवर वाढलेल्या फोकसमुळे, जगभरातील मोठय़ा टेक कंपन्यांनी एकत्रितपणे 1 लाख 20 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या आहेत. ही कपात केवळ तात्पुरती मंदी नसून उद्योगातील संरचनात्मक बदलांचे स्पष्ट संकेत देत आहे. चिपमेकर्स, आयटी सर्व्हिसेस, क्लाउड कंपन्या आणि टेलिकॉम कंपन्या अशा प्रत्येक प्रमुख टेक सेक्टरमध्ये मोठी कर्मचारी कपात दिसून आली आहे.
या वर्षी सर्वाधिक कर्मचारी कपात करून इंटेल कंपनी आघाडीवर राहिली. सेमीपंडक्टर क्षेत्रातील या कंपनीने सुमारे 24,000 कर्मचाऱ्यांची पदे कमी केली. दुसऱ्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस होती. टीसीएसमध्ये जवळपास 20 हजार कर्मचाऱ्यांची कपात झाली. व्हेरायझनने सुमारे 15 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या.
अॅमेझॉनने संघटनात्मक रचना सोपी करण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट कार्यबळात घट केली आणि सुमारे 14 हजार व्यवस्थापन आणि प्रशासकीय पदे संपुष्टात आणली.
डेल टेक्नॉलॉजीजने एआय-ऑप्टिमाइझ्ड हार्डवेअरकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे 12 हजार नोकऱ्या कमी केल्या.
अॅक्सेंचरमध्येही क्लायंटची मागणी जनरेटिव्ह एआय प्रोजेक्ट्सकडे वेगाने वळल्यामुळे सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांची कपात झाली.
एसएपीने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिझनेस एआयसाठी संसाधनांची पुनर्रचना करण्याच्या योजने अंतर्गत 10 हजार पदे कमी करण्याची घोषणा केली.
मायक्रोसॉफ्टनेही गेमिंग आणि अॅझ्युर डिव्हिजनसह सुमारे 9 हजार नोकऱ्या कमी केल्या.


























































