
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असून, दोन दिवसांपासून राधानगरी धरणाच्या उघडलेल्या स्वयंचलित चार पैकी दोन दरवाजे रात्री बंद झाले. तरीसुद्धा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या कमी अधिक पावसामुळे आज सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगा नदीने 43 फुटाची धोका पातळी गाठली. त्यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती उद्भवली असून ऐंशीहून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरी वस्तीतीत पाणी शिरलेल्या ठिकाणी नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 125.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 15 मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसापासून राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडे झाले त्यापैकी रात्री 10 वाजता 3 क्रमांकाचा आणि रात्री 11.15 वाजता 6 क्रमांकांचा स्वयंचलित दरवाजे बंद झाले. केवळ 4 आणि 5 क्रमांकाचे 2 दरवाजे सुरू असून, यामधून 4 हजार 256 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम. शिंदे यांनी दिली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 10 वाजता 42 फूट 8 इंच असून एकूण 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.राधानगरी धरणात आज अखेर 8.29 टीएमसी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव व चिखली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे व निलजी. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपणी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे व गवसी असे एकूण 80 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 78.29 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 105.87 इतका पाणीसाठा आहे.

























































