
मुंबईतील रस्त्यांची ऑक्टोबरपासून सुरू होणारी कामे टेंडरमधील जाचक आणि वारंवार वाढत जाणाऱया अटींमुळे डिसेंबर उजाडला तरी सुरू झाली नसल्याचा आरोप करीत बुधवारी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी कशी होणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
मुंबईत पालिकेच्या 1900 किमीच्या रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते अशी कामे ऑक्टोबर ते एप्रिलअखेरपर्यंत करण्यात येतात, मात्र या वर्षी डिसेंबर उजाडला तरी रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रियाच सुरू असल्याचे भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे निदर्शनास आणून दिले. पालिकेच्या ‘टी’ (मुलुंड) विभागात फेरनिविदेच्या फेऱयात रस्त्यांची कामे लटकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे ही कामे पुढच्या वर्षीदेखील पूर्ण होणे शक्य नसल्याचे शिंदे म्हणाले. रस्त्याची कामे लटकल्यामुळे मुंबईकरांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना निवेदन देऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देताना विरोधी पक्षनेते रवी राजा, ‘सपा’चे रईस शेख यांनी या प्रकाराला जबाबदार असणाऱया आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची कामे वेगाने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करावी असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले. रस्त्यांच्या कामांबाबत सद्यस्थितीचा अहवाल प्रशासनाने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
..म्हणूनच टेंडर लटकली
रस्त्यांचे काम केलेल्या कंत्राटदाराला ‘हमी कालावधी’ पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याची देखभालही करावी लागते. कंत्राटदारांनी देखभालीचे काम प्रामाणिपणे करावे यासाठी याआधी 20 टक्के अनामत रक्कम पालिका आपल्याकडे जमा ठेवत होती. ही रक्कम हमी कालावधी संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने अदा केली जाते, मात्र अलीकडे नियमात केलेल्या सुधारणांनुसार 40 टक्के अनामत रक्कम हमी कालावधी संपेपर्यंत ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात पैसे अडकून राहत असल्यामुळे याआधी 15 टक्क्यांपर्यंत कमी दराने येणारी टेंडर अक्षरशः तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढीव दराने येत असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. ही वाढीव दराची टेंडर आल्यामुळे पालिकेकडून पुन्हा निविदा मागवण्यात येत आहेत, मात्र या प्रक्रियेत रस्त्यांची कामे खोळंबत असल्याचे शिंदे म्हणाले.























































