युद्धाच्या फटक्यामुळे एअर इंडियाने तिकीट दरात केली वाढ, 8 एप्रिलपासून नवे दर लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. देशातील अग्रगण्य विमान कंपनी एअर इंडियाने वाढत्या खर्चाच्या दबावाला प्रतिसाद म्हणून आपल्या इंधन अधिभारात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीच्या या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाने देशांतर्गत उड्डाणांसाठी निश्चित अधिभाराऐवजी अंतर-आधारित ग्रिड प्रणाली लागू केली आहे. तथापि, एअरलाइनने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी अधिक महत्त्वपूर्ण दर बदल केले आहेत, कारण आंतरराष्ट्रीय ATF दरांवर कोणतीही मर्यादा नाही. एअर इंडियाने म्हटले आहे की, हा अधिभार जेट इंधनाच्या दरातील वाढ पूर्णपणे भरून काढत नाही. या वाढीचा काही भाग एअरलाइनलाच सोसावा लागत आहे.

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, २७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात जेट इंधनाची सरासरी जागतिक किंमत फेब्रुवारीमधील प्रति बॅरल ९९.४० डॉलरवरून वाढून १९५.१९ डॉलर झाली आहे. ही एकाच महिन्यात इंधनाच्या दरात झालेली जवळपास १०० टक्के वाढ आहे. परिणामी, जगभरातील विमान कंपन्यांसाठी इंधन हा सर्वात मोठ्या खर्चाच्या दबावांपैकी एक बनला आहे.