गहू निर्यातबंदी निर्णयामुळे; हिंदुस्थानवर सात देश भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारने गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय शनिवारी घेतला. या निर्णयाबद्दल जी-7 देशाच्या कृषिमंत्र्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. जी-7 मध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे.

जर्मनीचे कृषिमंत्री केम ओजडेमीर यांनी एका पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. प्रत्येकाने निर्यात रोखण्याचा निर्णय घेतल्यास संकट आणखी वाढेल आणि परिस्थिती बिघडेल, असे ओजडेमीर म्हणाले. हिंदुस्थान जी-20 चा सदस्य आहे. या गटाचा सदस्य म्हणून हिंदुस्थानने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन ओजडेमीर यांनी केले.

हिंदुस्थानात गव्हाचे दर वाढले आहेत. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने गव्हाची निर्यात थांबविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गव्हाच्या एकूण जागतिक निर्यातीपैकी 25 टक्के निर्यात रशिया आणि युक्रेन करतात, मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम गव्हाच्या निर्यातीवर झाला आहे. रशिया, युक्रेनकडून पुरेसा गहू मिळत नसल्याने युरोपसह आफ्रिकन देशांच्या नजरा हिंदुस्थानकडे होत्या, मात्र हिंदुस्थान सरकारने गहू निर्यात रोखल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.