शिकाऊ वाहन परवान्यासाठी आता डमी उमेदवाराची ‘नो एंट्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी ऑनलाईन परीक्षा देताना दहावीच्या परीक्षेप्रमाणे डमी उमदेवार बसविले जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ही लर्निंग लायसन्सची परीक्षा दलालाच उमदेवाराच्या नावाखाली देत असल्याचेही उघड झाले होते. यावर मात करण्यासाठी एनआयसीने एक सॉफ्टवेअर तयार केले असून ते आधारकार्डावरील फोटोशी कनेक्ट करण्यात आले असल्याने अशा डमी उमेदवारांना बसविणे अवघड झाले आहे. या नव्या प्रणालीचा वडाळा आरटीओ येथे प्रारंभ करण्यात आला आहे.

कोरोना लाटेत नागरीकांवर बंधने असल्याने त्यांना सोयीचे व्हावे म्हणून एप्रिल 2021 पासून शिकाऊ वाहन परवान्यांसाठी घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केली. परंतू दलालांनी त्यावर कडी करीत स्वत:च चाचणी देऊन उमेदवारांना परीक्षेतून सूट दिली. त्यामुळे कोणालाही लायसन्स मिळू लागले होते. त्यामुळे परिवहन विभागाने आता नव्या तंत्राचा आधार घेतला आहे. यासाठी उमेदवाराचा आधारकार्डावरील फोटोशी साधर्म्य शोधले जाणार असून तो वेगळा असेल तर प्रक्रिया पुढे सरकरणार नाही अशी सोय केली आहे. तसेच उमेदवाराला कॅमेर्‍यासमोर ठेवून लगेच त्याला उठवून दलाल स्वत तेथे बसून चाचणी परीक्षा देत होते. त्यामुळे आता यापुढे कॅमेर्‍यासमोरून जरा जरी हालचाल झाली तरी ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया थांबली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सारथी सॉफ्टवेअरमध्ये केले बदल..
परिवहन विभागाने ‘सारथी’ सॉफ्टवेअरमध्ये यासाठी बदल केले आहेत. नॅशनल इफॉरमेटीक्स सेंटर अर्थात ‘एनआयसी’ यांनी हे नवे सॉफ्टवेअर तयार केले असून त्यात वेब कॅमेर्‍यासमोर बसलेली व्यक्ती उठून तेथे दुसरी व्यक्ती बसली की मुलाखतीची प्रक्रिया तेथे थांबली जाईल अशी सोय करण्यात आली आहे. आधारकार्डवरील डाटा वापरून उमेदवाराचा त्याच्या आधारवरील फोटोशी साम्य शोधूनच त्याला ऑनलाईन परीक्षेला बसता येईल असे सूत्रांनी स्पष्ट केले.

धोका का निर्माण झाला…
शिकाऊ वाहन परवाना हा उमेदवाराला वाहन चालविणे शिकण्यासाठी मिळालेला असतो. तो केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. त्यानंतर ‘पक्के लायसन्स’ बनवावे लागते. शिकाऊ व्यक्ती गाडी चालवित असताना त्याच्या शेजारी पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती बसणे गरजेचे असते. असे कोणालाही शिकाऊ लायसन्स मिळाल्याने चुकीच्या हाती स्टिअरींग गेल्याने अपघाताचा धोका असल्याने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.