
सामना प्रतिनिधी । नांदेड
राज्यभरात गाजलेल्या डमी परीक्षार्थी घोटाळ्यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. निखिल शिरासिंग चव्हाण या मुळ विद्यार्थ्यांच्या नावावर परीक्षा देणाऱ्या व त्याला सहकार्य करणाऱ्या तिघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुळ विद्यार्थ्यांच्या नावे अन्य हुशार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवून परीक्षेत पास करणे आणि परीक्षार्थीला नौकरी मिळवून देण्याचे रॅकेट गाजले होते. याबाबत राज्यभर बारा ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. एमपीएससी परीक्षा, लिपिक वर्गीय परीक्षा यासंदर्भातले हे गुन्हे दाखल झाले होते. संभाजीनगरच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरुच ठेवला आहे. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात 22 जानेवारी 2015 रोजी लिपिक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात निखिल शिरासिंग चव्हाण हा मुळ उमेदवार होता. परंतु त्याच्या नावावर डमी परीक्षार्थी म्हणून परभणीच्या कृषी विद्यापीठातील कर्मचारी अरविंद टाकळकर याला परीक्षेला बसविण्यात आले. त्यानंतर निखिल चव्हाण हा पासही झाला आणि त्याला लिपिक पदाची नोकरीही मिळाली. या प्रकरणातील सखोल तपासणीनंतर संभाजीनगरच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरु केली आणि हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या आदेशानुसार गोविंदसिंग गणपतसिंग पाटनूरकर यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी निखिल चव्हाण, प्रबोध राठोड, अरविंद टाकळकर यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे हे करीत आहेत.

































































