
सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आज पार पडला. ऑस्कर पुरस्कारांत ‘डय़ून’ चित्रपटाने बाजी मारली. ‘डय़ून’ला तब्बल 11 नामांकने मिळाली, त्यापैकी 6 पुरस्कारांवर चित्रपटाने आपले नाव कोरले. विल स्मिथ हा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टन ठरली. ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला.
ऑस्कर पुरस्काराचे यंदाचे 94वे वर्ष आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर हा सोहळा प्रत्यक्ष थिएटरमध्ये रंगला. त्यामुळे सर्वच कलाकारांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. ऑस्कर सोहळय़ाच्या परंपरेला साजेसा असा हा दिमाखदार सोहळा पार पडला. या शानदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा सायकस यांनी केले. वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावले. ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण सहा पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्टचे काम हिंदुस्थानच्या नमित मल्होत्रा यांच्या कंपनीने केले आहे.
हिंदुस्थानींच्या पदरी निराशा
सर्वोत्कृष्ट माहितीपट या विभागात हिंदुस्थानच्या ‘रायटिंग विथ फायर’चे नामांकन झाले होते. त्यामुळे हिंदुस्थानींचे या सोहळय़ाकडे लक्ष लागले होते. मात्र ‘द समर ऑफ सोल’ने सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्कारावर नाव कोरले. ‘रायटिंग विथ फायर’ माहितीपट दलित महिलांकडून चालवल्या जाणाऱया ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राच्या वाटचालीवर आहे.
विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली
ऑस्करच्या मंचावर पत्नीची खिल्ली उडवली म्हणून संतापलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानशिलात लगावण्याचा धक्कादायक प्रकार घडला. क्रिस रॉकने ‘जी. आय. जेन’ चित्रपटावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिकेंट स्मिथची थट्टी केली. जेडाचे केस कमी असल्यामुळे तिला चित्रपट मिळाला, असे भाष्य क्रिसने केले. परंतु अॅलोपेसिया या गंभीर आजारामुळे जेडाचे केस कमी झाले आहेत. पत्नीवर चुकीच्या पद्धतीने झालेली कमेंट सहन न झाल्याने स्मिथ याने क्रिसच्या कानाखाली मारली. आपल्या कृत्याबद्दल त्याने अकॅडमीची माफी मागितली.
विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट– कोडा ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी कोडा चित्रपटाच्या सर्व कलाकारांना स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – विल स्मिथ (चित्रपट – किंग रिचर्ड)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन (चित्रपट- द आईज ऑफ टॅमी फाये)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन पॅम्पियन (चित्रपट- द पॉवर ऑफ द डॉग) सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणे- नो टाइम टू डाय, संगीतकार बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल
- सर्वोत्कृष्ट माहितीपट – समर ऑफ सोल
- प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती- आर्मी ऑफ द डेड
- सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले- शॉन हेडर
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले- केनेथ ब्रनाघ (चित्रपट बेलफास्ट)
- सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- जेनी बीवन (चित्रपट क्रुएला)
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा- ड्राइव्ह माय कार (जपान)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- ऑरिएना डीबोस (चित्रपट वेस्ट साइड स्टोरी)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर (चित्रपट- कोडा)




























































