
>> दुर्गेश आखाडे
बालनाटय़ातून रंगभूमीवर पाऊल ठेवल्यानंतर वयाच्या 68व्या वर्षीही रंगभूमीची सेवा अविरतपणे सुरू ठेवणारे रत्नागिरीतील रंगकर्मी दत्ता केळकर यांनी. रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात पारावरची नाटय़ चळवळ 40 वर्षांहून अधिक काळ जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान उचलले. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून, कधी देणगी गोळा करून तर कधी तिकीट विक्रीतून नाटकाचा प्रयोग आयोजित करत पारावरची चळवळ त्यांनी सुरू ठेवली. दत्ता केळकर यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. 1964 साली मुंबई महानगरपालिकेच्या छबिलदास बालनाटय़ स्पर्धेत त्यांनी ‘कलिंग देशाचा राजा’ या बालनाटय़ात ‘खोकला’ हे पात्र सादर केले होते. रंगभूमीवरचे त्यांचे ते पहिले पाऊल होते. तिथूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर शहरातील अठरा हातांच्या गणपती मंदिरातील उत्सवाच्या नाटकात ते सहभागी होऊ लागले.
‘काळं बेट लाल बत्ती’ या नाटकात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली. तिथून त्यांच्या पारावरच्या रंगभूमीचा प्रवास सुरू झाला. 1982 साली ‘नाटय़ सहयोग’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटय़ प्रयोग करायला सुरुवात केली. ‘काळं बेट लाल बत्ती’चे त्यांनी 13 प्रयोग केले. त्या काळात टीव्ही हे माध्यम नसल्यामुळे उत्सवाच्या नाटकांना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी व्हायची. कलाकार कुठलेही मानधन घेत नसायचे. त्याहीपेक्षा हे कलाकार स्वतःच्या खर्चाने तालमीला येत तसेच प्रयोगालाही येत असत. त्या काळात प्रेक्षकांमधून मिळणारे प्रेम हेच कलाकारांचे मानधन होते. नाटय़ प्रयोग करतानाही कलाकारांना पदरमोड करावी लागत असे. त्या काळात फार देणग्या मिळत नव्हत्या. मग नाटकाचा एखादा प्रयोग लावायचा आणि त्या तिकीट विक्रीतून चार पैसे गोळा करायचे किंवा उत्सवाला नाटक सादर करून त्यातून निधी गोळा करायचा. अशा रीतीने ही नाटय़ चळवळ रत्नागिरीत सुरू होती. त्या काळात रत्नागिरीमध्ये सुरुवातीला श्रीराम नाटय़गृह होते. श्रीराम नाटय़गृहानंतर काही वर्षांनी पुरुषोत्तम नाटय़गृह सुरू झाले. त्यापुढे रत्नागिरीतील नाटय़ प्रयोग यशवंत नाटय़गृहाच्या रंगमंचावर रंगू लागले. या नाटय़गृहांच्या रंगमंचावर रत्नागिरीची नाटय़ चळवळ उभी राहिली. त्या काळात पाच रुपये किंवा दहा रुपये तिकीट दर होता. बांधावर बसून नाटक पहायला दोन रुपये तिकीट दर होता. लोक आवडीने नाटक पहायला येत असत.
त्यानंतर 2006 साली स्वा.वि.दा.सावरकर नाटय़गृह सुरू झाले. रत्नागिरीत बंदिस्त नाटय़गृह नसताना दत्ता केळकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी ही नाटय़ चळवळ उभी केली.1982 साली संगीत नाटय़ स्पर्धेत त्यांनी ‘संगीत सौभद्र’ हे नाटक सादर केले. त्यानंतर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘संशयकल्लोळ’मध्ये दत्ता केळकर यांनी रंगवलेले ‘वैशाखशेठ’ हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गद्य नाटकांबरोबरच संगीत नाटकांचीही चळचळ त्यांनी राबवली. ‘संशयकल्लोळ’, ‘मंदारमाला’, ‘मानापमान’, ‘मत्स्यगंधा’, ‘मृच्छकटिक’, ‘मदनाची मंजिरी’ हे नाटय़ प्रयोग त्यांनी सादर केले. संगीत राज्य नाटय़ स्पर्धेमध्ये मुंबई आणि पुण्याचे वर्चस्व होते. हे वर्चस्व मोडून काढत दत्ता केळकर यांच्या ‘नाटय़ सहयोग’ या संस्थेने सादर केलेल्या संगीत ‘मंदारमाला’ या नाटकाने स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. राज्य नाटय़ स्पर्धेच्या 42 वर्षांच्या इतिहासात पहिले आलेले हे रत्नागिरीतील हे पहिलेच नाटक होते. त्यानंतर रत्नागिरी जिह्यातील अनेक संस्थांनी राज्य नाटय़ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 1998 ला दत्ता केळकर यांनी आपल्या सहकाऱयांना घेऊन ‘सहयोग’ ही नाटय़ संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी गद्य आणि संगीत प्रयोग सादर केले आहेत. संगीत ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचे दिग्दर्शनही सांभाळताना अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची चुणूक दाखवली होती. त्याचबरोबर काही नाटकांमध्ये त्यांनी नेपथ्याची जबाबदारीही चोख बजावली होती. ‘सहयोग’ संस्थेच्या माध्यमातून संगीत ‘सौभद्र’ या नाटकाचे त्यांनी 13 प्रयोग केले. ‘सौभद्र’ या नाटकात राक्षस आणि बलराम अशा दोन्ही भूमिका ते करत असत. पहिल्या अंकात राक्षसाची भूमिका केल्यानंतर दुसऱया प्रयोगात वेश बदलून बलरामाची भूमिकाही ते तितक्याच ताकदीने करत. संगीत राज्य नाटय़ स्पर्धेबरोबरच त्यांनी दिल्ली येथे होणाऱया अखिल भारतीय संगीत नाटय़ स्पर्धेत आठ वर्षे सहभाग घेतला. दिल्लीतील त्यांचा ‘मंदारमाला’ हा नाटय़ प्रयोग पाहून त्यांना कोलकाता महाराष्ट्र मंडळाने कोलकाता येथे बोलावले होते. कोलकातातील प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. दत्ता केळकर संगीत नाटकात वाचन अभिनय करत असत. आजही दत्ता केळकर यांची ‘सहयोग’ नाटय़ संस्था संगीत नाटय़ स्पर्धेत आणि उत्सवात प्रयोग सादर करते. वयाच्या 68व्या वर्षीही न थकता दत्ता केळकर आजही रंगभूमीची सेवा करतात. आपण गेली 40 वर्षे रत्नागिरीच्या रंगभूमीवर काम करणारे कलाकार आहोत असा बडेजाव न करता दत्ता केळकर आजही व्यावसायिक नाटकांच्या तिकीट विक्रीचे काम करतात. रत्नागिरीतील कोणतेही नाटय़गृह असो. नाटय़गृहाच्या तिकीट विक्री खिडकीवर दत्ता केळकर रसिक प्रेक्षकांचे हसतमुखाने स्वागत करतात.























































