आठवड्यात तापमानाचा पारा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे सावट आहे. राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे वातावरणात काहीसा गारवा आला होता. त्यामुळे उन्हाने तापलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता या आठवड्यात पुन्हा तापमान वाढणार असून उन्हाचे चटके बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मार्च महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली होती. मात्र, राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात काहीसा गारवा आला होता. आता एप्रिल दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात देशातील तापमान 3 ते5 अंशाने वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

उन्हाच्या झळा तीव्र होण्याबरोबरच महाराष्ट्र आणि दक्षिण हिंदुस्थानात काही ठिकाणी पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.